वृत्तसंस्था/ हैद्राबाद
भारताची अव्वल टॉप सीडेड तसेच विश्वविजेती महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने बॅडमिंटनच्या सरावासाठी ब्रिटनला जाण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. कोरोना महामारीमुळे आपल्याला सराव करता आला नाही दरम्यान ब्रिटनमध्ये सरावासाठी जाण्याचा निर्णय योग्य ठरला, असे प्रतिपादन सिंधूने केले आहे.
2020 बॅडमिंटन हंगामात कोरोना महामारीमुळे आपल्याला अनेक स्पर्धांना मुकावे लागले. बॅडमिंटनचा सराव जरूरीचा असल्याने गेल्या ऑक्टोबरमध्ये ब्रिटनमध्ये सरावासाठी जाण्याचा निर्णय सिंधू घेतला होता. आगामी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धांसाठी सरावाची मला अत्यंत गरज भासत होती. 12 ते 17 त्याचप्रमाणे 19 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱया दोन व्यावसायिक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सिंधूचे पुनरागमन होत आहे. या दोन्ही स्पर्धां थायलंडमध्ये खेळविल्या जाणार आहेत. सध्या जागतिक महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात सिंधू सातव्या स्थानावर आहे. लंडनमध्ये 11 ते 15 मार्च 2020 दरम्यान झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता.