वृत्तसंस्था / सिडनी :
2020 च्या टेनिस हंगामातील येथे खेळविण्यात येत असलेल्या पहिल्या एटीपी चषक सांघिक पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने ब्रिटनचा 2-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. रशियाने अर्जेंटिनाचा पराभव करत शेवटच्या चार संघामध्ये स्थान मिळविले आहे.
ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसने ब्रिटनच्या कॅमेरून नुरीचा 6-2, 6-2 असा पराभव करत ब्रिटनशी बरोबरी साधली. तत्पूर्वी झालेल्या एकेरी सामन्यात ब्रिटनच्या डॅन इव्हान्सने ऑस्ट्रेलियाच्या डि मिनॉरचा 7-6 (7-4), 4-6, 7-6 (7-2) असा पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार हेविटने दुहेरीच्या सामन्यासाठी पियस आणि ग्युसोनी यांच्या जागी किरगॉईस आणि मिनॉर यांना खेळविण्याचा निर्णय घेतला. या दुहेरीच्या सामन्यात किरगॉईस आणि मिनॉर यांनी ब्रिटनच्या जेमी मरे आणि सॅलिसबेरी यांचा 3-6, 6-3, 7-6 (18-16) असा पराभव करत ब्रिटनचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणत ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. हा दुहेरीचा सामना तब्बल साडेतीन तास चालला होता. नादालच्या नेतृत्वाखाली स्पेन संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. स्पेन आणि बेल्जियम यांच्यातील लढत शुक्रवारी होत आहे. दरम्यान रशियाने अर्जेंटिनाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.