ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या प्रवाशांपैकी पाच कोरोना संक्रमित रुग्णांनी नमुने दिल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पलायन केले. त्यापैकी चार जणांना दिल्लीतील लोकनायक हॉस्पिटलमध्ये परत आणण्यात आले आहे. मात्र, आता या लोकांच्या संपर्कात येणाऱ्यांची ओळख पटवणे सरकारला अडचणीचे ठरले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर आतापर्यंत एक हजारांहून अधिक लोक दिल्लीत आले आहेत, त्यापैकी तेरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते कोरोनाच्या नव्या प्रकाराने संक्रमित आहेत की नाही, याबाबतचा तपास सुरू आहे.
दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पलायन करणाऱ्या कोरोना संक्रमितांपैकी एक नोएडा, दोन दिल्ली, एक लुधियाना आणि एक महिला आंध्रप्रदेशातील होती. नमुना देऊन पलायन केल्यानंतर 48 तासांच्या आत यातील चौघांना पकडण्यात आले. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्रप्रदेशातील पथके या बधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेत आहेत.