ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ब्रिटनमधून भारतात परतलेल्या 20 प्रवाशांमध्ये आतापर्यंत कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.
भारतासह अन्य देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानसेवा थांबवली आहे. मात्र, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान, ब्रिटनमधून 33 हजार नागरिक भारतात परतले आहेत. त्यांचा शोध घेऊन कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 144 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांचे नमुने कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बेंगळूर, एनआयएमएचएएनएस बेंगळूर, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले. त्यामधील 20 बाधितांमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची बहुतेक प्रकरणे दिल्लीत आढळून आली आहेत. दिल्लीतील एनसीडीसी प्रयोगशाळेत 14 पैकी 8 नमुने सापडले आहेत. बेंगळूरच्या निमहंस प्रयोगशाळेत होणाऱ्या संसर्गांची संख्या 7 आहे. कोलकाता आणि पुण्याच्या प्रयोगशाळेत कोरोनाच्या नव्या प्रकारचे प्रत्येकी एक प्रकरण आढळून आले आहे. सीसीएमबी हैदराबाद येथे दोन नवीन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. याशिवाय दिल्लीस्थित इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीमध्ये एक नमुना पॉझिटिव्ह आढळला आहे.