वृत्तसंस्था/ लंडन
चीनचे नवे राजदूत झेंग जेगुआंग यांना बुधवारी ब्रिटनच्या संसदेत होणाऱया बैठकीत भाग घेण्यापासून रोखण्यात आले. राजनयिक जेगुआंग यांना रोखण्याचा निर्णय हाउस ऑफ कॉम्स आणि हाउस ऑफ लॉर्ड्सच्या सभापतींनी घेतला. चिनी राजदूताला निमंत्रण दिल्याने ब्रिटिश खासदार अत्यंत नाराज झाले होते, याचमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
झेंग हे बुधवारी संध्याकाळी हाउस ऑफ कॉमन्समध्ये ऑल-पार्टी पार्लियामेंट्री चायना ग्रुप आणि चीन-ब्रिटन बिझनेस कौन्सिलच्या समर रिसेप्शनमध्ये सामील होणार होते. ऑल-पार्टी पार्लियामेंट्री चायना ग्रुप चीनसोबत चांगले संबंध इच्छिणाऱया खासदारांचा समूह आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढलेला असताना ब्रिटिश संसदेने राजदूतांना रोखण्याची कारवाई केली आहे.
हे पूर्ण प्रकरण चीनच्या शिनजियांगमध्ये उइगूर मुस्लिमांच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाशी निगडित आहे. चीनने मार्च महिन्यात ब्रिटिश खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दौऱयावर बंदी घातली होती. तसेच त्यांना चीन किंवा हाँगकाँगमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता.
चीनला ठरविले जबाबदार
शिनजियांगमध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी चीनला जबाबदार ठरवत चिनी अधिकाऱयांवर ब्रिटनसोबत अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघाने बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश खासदारांवर चीनने कारवाई केली होती.
निर्णय स्वागतार्ह
ब्रिटिश खासदार इयान डंकन स्मिथ, नुस गनी आणि टिम लॉटन यांनी झेंग यांना प्रतिबंधित करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चीनच्या राजदूताला प्रवेश दिला असता तर संसद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वाचा अपमान झाला असता. मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करणाऱया खासदारांना चीनकडून मज्जाव करण्यात आला होता असे तिन्ही खासदारांनी एक वक्तव्य प्रसिद्ध करत म्हटले आहे.
चीनकडून निंदा
तर चिनी राजदूतावर ब्रिटिश संसदेच्या या कारवाईची चीनने निंदा केली आहे. ब्रिटनच्या संसदेकडून उचलण्यात आलेल्या या पावलामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडू शकतात असे चिनी दूतावासाकडून म्हटले गेले आहे.