हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी ‘ऑकस’ : चीनच्या आव्हानाला नवे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था / लंडन, वॉशिंग्टन
ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या प्रभावादरम्यान सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण या क्षेत्रासाठी एक नवी त्रिपक्षीय सुरक्षा आघाडी ‘ऑकस’ (एयूकेयुएस)ची घोषणा केली आहे. स्वतःच्या संयुक्त हितसंबंधांचे रक्षण करणे आणि अणुऊर्जेने संचालित पाणबुडी प्राप्त करण्यास ऑस्ट्रेलियाची मदत करण्यासह संरक्षण क्षमतांची उत्तमप्रकारे देवाणघेवाण करण्याचा यामागे उद्देश आहे.
ऐतिहासिक ठरविण्यात येणारी ही नवी आघाडी ‘ऑकस’ला बुधवारी टेलिव्हिजनवर प्रसारित एका संयुक्त संबोधनादरम्यान डिजिटल माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या आघाडीच्या अंतर्गत तिन्ही देश संयुक्त क्षमतांचा विकास करणे, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, सुरक्षेसाठी एकीकरणाला चालना देणे, संरक्षणसंबंधित विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिक केंद्रे आणि पुरवठा साखळीला मजबूत करण्यावर सहमत झाले आहेत.
ऑकसच्या पहिल्या मोठय़ा पुढाकाराच्या अंतर्गत अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेने संचालित होणाऱया पाणबुडय़ांचा एक ताफा तयार करणार आहे. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे नैसर्गिक सहकरी आहेत. आम्ही भौगोलिक आधारावर वेगळे असलो तरीही आमचे हितसंबंध आणि मूल्ये एकसारखी असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे.
ऑकस आघाडी आम्हाला अधिक जवळ आणणार आहे. एक नवी संरक्षण भागीदारी तयार करू, नोकऱया निर्माण होतील आणि समृद्धीत भर पडणार आहे. ही भागीदारी हिंद-प्रशांत क्षेत्रात आमच्या हितसंबंधांच्या रक्षणाची महत्त्वपूर्ण होत जाणार आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात, आमचे आसियान मित्र, आमचे द्विपक्षीय सामरिक भागीदार, क्वाड, फाइव्ह आइज देश आणि निश्चितपणे आमच्या प्रिय हिंद-प्रशांत परिवारासोबत भागीदारीच्या आमच्या वाढत्या नेटवर्कमध्ये योगदान वाढविणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले आहे.
तिन्ही देश 20 व्या शतकाप्रमाणेच 21 व्या शतकातील धोक्यांना सामोरे जाण्याची स्वतःची संयुक्त क्षमता वाढवतील. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन दीर्घकाळापासून सक्षम भागीदार राहिले असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
पुढील आठवडय़ात क्वाड बैठक
ऑकसची घोषणा 24 सप्टेंबर रोजी वॉशिंग्टनमध्ये बायडेन यांच्याकडून आयोजित होणाऱया क्वाड नेत्यांच्या बैठकीपूर्वी झाली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा देखील सामील होणार आहेत.
शीतयुद्धकालीन मानसिकता सोडा
या नव्या त्रिपक्षीय भागीदारीमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. या देशांनी त्रयस्थ देशाला नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशांनी निर्णय घेऊ नयेत. या देशांनी स्वतःची शीतयुद्धकालीन मानसिकता सोडून द्यावी असे वॉशिंग्टनमधील चीनच्या दूतावासाने म्हटले आहे.
फ्रान्स नाराज
ऑकस अंतर्गत अमेरिका आण्विक क्षमतायुक्त पाणबुडी तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला तंत्रज्ञान उपलब्ध करणार आहे. पण फ्रान्सने या कराराला विरोध केला आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स यांच्यात पाणबुडय़ांच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलर्सचा करार झाला होता. ऑकसमुळे ऑस्ट्रेलियाने या करारातून आता माघार घेतली आहे.