अत्यंत स्वस्त लसीची चाचणी : 300 रुपये असणार किंमत : मॉडर्नाचा लसनिर्मिती प्रकल्प तिसऱया टप्प्यात
वृत्तसंस्था/ लंडन
जगभरात फैलावलेल्या कोरोना महामारीदरम्यान ब्रिटन, अमेरिका आणि चीनमधून 3 चांगल्या बातम्या समोर आल्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूवरील आणखी एक लस तयार करण्यात आली असून बुधवारपासून याची चाचणी सुरू होणार आहे. तर मॉडर्ना या अमेरिकन कंपनीच्या एमआरएनए-1273 या लसीची तिसऱया टप्प्यातील चाचणी पुढील महिन्यात सुरू होणार असून यात 30 हजार लोक सहभागी होतील. याचदरम्यान चीनच्या कंपनीने आपण निर्मिलेली लस दिल्यावर 90 टक्के लोकांना कोरोना विरोधात लढण्याची क्षमता निर्माण झाल्याचे सांगितले आहे.
ब्रिटनच्या इंपीरियल कॉलेजची लस तयार झाली असून बुधवारपासून त्याची चाचणी सुरू होणार आहे. ही लस उपयुक्त ठरल्यास ती सुमारे 300 रुपयांमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 120 जणांना ही लस दिली जाणार आहे. लसीची किंमत अत्यंत कमी ठेवण्याचा प्रयत्न असून याद्वारे ब्रिटनच्या पूर्ण लोकसंख्येला ती उपलब्ध होणार असल्याचे लसप्रकल्पाचे प्रभारी प्राध्यापक रॉबिन शटॉक यांनी म्हटले आहे.
या लसीची चाचणी यशस्वी ठरल्यास दुसऱया टप्प्यात 6 हजार लोकांना ती दिली जाणार आहे. सर्वकाही योजनेरुप पार पडल्यास 2021 मध्ये ही लस उपलब्ध होणार असल्याचे शटॉक यांनी सांगितले आहे. तर ऑक्सफोर्ड विद्यापीठाची लस सप्टेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, असा विश्वास ब्रिटन सरकारला आहे.
तिसऱया टप्प्यातील चाचणी
मॉडर्नाच्या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणी जुलैमध्ये सुरू होणार आहे. अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स येथील मॉडर्ना थेराप्यूटिक्सची ही लस मानवी प्रतिकारकक्षमतेला कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रशिक्षित करणार आहे. तिसऱया टप्प्यात अमेरिकेची कंपनी 30 हजार जणांना सामील करणार आहे. लस लक्षणेयुक्त कोरोना विषाणूला रोखण्यास सक्षम आहे की नाही हे चाचणीत पडताळून पाहिले जाणार आहे. गंभीर रुग्णांना बरे करण्यास लस प्रभावी ठरते की नाही हे ही तपासले जाणार आहे. 2021 पर्यंत 1 अब्ज लस निर्माण करण्याची तयारी पूर्ण झाल्याचे मॉडर्नाने स्पष्ट केले आहे.
90 टक्क्यांवर उपयुक्त
चीनच्या एका कंपनीने लसीच्या मानवी चाचण्यांमधून प्राप्त झालेली माहिती सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. सिनोवॅक बायोटेक लिमिटेडने लस सुरक्षित असून प्रतिकारकक्षमता निर्माण करण्यास यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. कोरोना वॅक नावाच्या या लसीच्या चाचणीत भाग घेणाऱया स्वयंसेवकांमध्ये 2 आठवडय़ांनी विषाणू नष्ट करणाऱया अँटीबॉडी निर्माण होण्यास प्रारंभ झाला आहे. लसीमुळे कुठलेच साइड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत.
दुसरा टप्पा यशस्वी
पूर्व चीनच्या जिंग्यासू प्रोविंशल सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशमध्ये चाचणी पार पडली आहे. तेथे 18-59 या वयोगटातील 743 तंदुरुस्त लोकांना वेळापत्रकानुसार शॉट्स किंवा प्लेसिबो (प्रत्यक्ष लस नव्हे) देण्यात आला आहे. यातील 143 स्वयंसेवक पहिल्या टप्प्यात सामील असून यात लसीची सुरक्षितता पडताळून पाहिली जात आहे. लसीमध्ये विषाणूच्या मृत स्ट्रेनचा वापर केला जात आहे. 90 टक्के लोकांमध्ये या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. दुसऱया टप्प्यात लस सुरक्षित आढळल्याचे उद्गार सिनोवॅकचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेइडॉन्ग यिन यांनी काढले आहेत.