लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनमधील सत्ताधारी पक्षाचे खासदार डेव्हीड अमेस यांची चर्चेमध्ये चाकूने सपासप वार करुन हत्या करणारा व्यक्ती हा मुस्लीम दहशतवादी असल्याचे उघड झाले आहे. ही हत्या शुक्रवारी झाली होती. मारेकऱयाला त्वरित अटक करण्यात आली होती. त्याचे नावे अली हरबी अली असे असल्याचे घोषित करण्यात आले. तो दहशतवादी असल्याचेही निष्पन्न झाले.
त्याला आता ब्रिटनच्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून त्याच्या कोठडीत वाढ केली जाऊ शकते. अली हा सोमाली वंशाचा ब्रिटीश नागरक आहे. त्याची चौकशी स्कॉटलंड यार्ड दहशतवाद विरोधी दलाकडून केली जात आहे. त्याचा कोणत्या दहशतवादी गटाशी संबंध आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. सध्या त्याला स्वयंप्रेरित दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.
वेगवान चौकशी
या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असे ब्रिटीश पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या लंडन येथील तीन घरांची झडती घेतली जात आहे. या आरोपीचे संबंध कोणाबरोबर आहेत, हे शोधण्यात येत आहे. तसेच तो शस्त्रासह इतक्या सहजगत्या चर्चमध्ये असा पोहचला हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्व लोकप्रतिनिधींना सुरक्षा
ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी लोकप्रतिधींच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा आदेश काढला आहे. सर्व 650 संसद सदस्यांना पुरेशी सुरक्षा सर्व ठिकाणी पुरवावी, असे त्यांनी ब्रिटनच्या पोलीस अधिकाऱयांना सूचित केले. ब्रिटनमध्ये यापूर्वी 2016 मध्ये जो कॉक्स नामक खासदाराची हत्या करण्यात आली होती.