सत्तारुढ पक्षाच्या खासदारावर चर्चमध्ये चाकूने हल्ला
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये एका माथेफिरूने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पक्षाचे खासदार डेव्हिड अमीस यांच्यावर चाकूने हल्ला केला आहे. अमीस यांना गंभीर स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. चर्चमध्ये स्वतःच्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधताना अमीस यांच्यावर हल्ला झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अमीस यांच्यावर अनेक वार करण्यात आले होते. समर्थकांनी स्वतःच्या खासदाराला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. हल्लेखोर 25 वर्षीय असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू हस्तगत करण्यात आला आहे. अनीस हे 38 वर्षांपर्यंत खासदार राहिले, पण त्यांना कधीच मंत्रिपद मिळाले नव्हते.
खासदारांच्या सुरक्षेचा मुद्दा
2016 मध्ये महिला खासदार जोए कॉक्स यांची हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वीच ब्रिटनच्या संसदेबाहेर खासदारांचा सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. काही वर्षांपूर्वी सर लिंडसे होएल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याप्रकरणी अहवाल तयार केला होता. खासदारांना आता त्यांच्या मतदारसंघातही सुरक्षा प्राप्त होते. तसेच त्यांच्याकडे पर्सनल अलार्म सारखे तंत्रज्ञान देखील असते. याचबरोबर खासदारांना पोलिसांकडून वाढीव सुरक्षा मागता येते. पण सुरक्षा देण्याप्रकरणी भेदभावाचा मुद्दा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात उपस्थित राहतो.
एसेक्सच्या साउथएंडचे खासदार
अमीस हे एसेक्सच्या साउथएंडचे खासदार होते, हा भाग पूर्व इंग्लंडचा हिस्सा आहे. हल्ल्याच्या घटनेवेळी ते मेथोडिस्ट चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. प्रार्थनेनंतर काही लोकांशी चर्चा करत असताना हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले होते.
ही भयावह घटना ः मजूर पक्ष
डेव्हिड यांच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले होते असे अमीसचे यांचे समर्थक आणि लोक कौन्सिलर जॉन लॅम्ब यांनी म्हटले आहे. ही अत्यंत भयावह घटना आहे. मला डेव्हिड यांच्या कुटुंबाला चिंता वाटत असल्याचे उद्गार मजूर पक्षाचे नेते काएर स्टेमर यांनी काढले आहेत.
हल्ल्यांची मालिका
अमीस हे पहिल्यांदा 1983 मध्ये खासदार झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा मतदारसंघ बदलला आणि 1997 पासून ते साउथएंड भागातून जिंकत राहिले होते. पशू संरक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. 2010 मध्ये मजूर पक्षाचे स्टीफन टिम्स यांच्यावरही अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 2016 मध्ये मजूर पक्षाचे नेते जोए कॉक्स यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
काही गट नाराज 69 वर्षीय अमीस यांनी अनेकदा समलैंगिक विवाह आणि गर्भपाताच्या मुद्दय़ांवर जाहीरपणे विरोध दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेवर काही गट खूपच नाराज होते.