वृत्तसंस्था/ सिडनी
महिला टेनिसमधील माजी अग्रमानांकित रशियाची मारिया शरापोव्हा जानेवारीत होणाऱया ब्रिस्बने इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वी होणाऱया या स्पर्धेत आयोजकांनी शरापोव्हाला वाईल्डकार्ड प्रवेश दिला आहे.
पाच वेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविलेल्या शरापोव्हाने गेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकन ओपनमधील पहिल्या फेरीत शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. दुखापतीमुळे तिला आठ स्पर्धा हुकल्याने तिच्या क्रमवारीतही खूपच घसरण झाली असून ती सध्या 133 व्या क्रमांकावर आहे. ब्रिस्बेनमधील स्पर्धेत 32 वर्षीय शरापोव्हासह ऑस्ट्रेलियाची विद्यमान अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, जपानची नाओमी ओसाका, कॅरोलिना प्लिस्कोव्हा याही खेळताना दिसणार आहेत. बलाढय़ खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा क्वीन्सलँड टेनिस कोर्टवर 6 ते 12 जानेवारी या कालावधीत होणार आहे.
शरापोव्हाचे मानांकन घसरले असल्याने ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्यासाठी तिला वाईल्डकार्ड प्रवेश मिळण्याची गरज आहे. ही स्पर्धा 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे. शरापोव्हाने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. तिचे ते तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद होते. पण 2016 मधील स्पध्sा&त तिने निर्बंधित उत्तेजक घेतल्याचे आढळून आल्यानंतर तिच्यावर 15 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.