आर माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या ब्रीद या वेबसिरीजचा पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसरा सिझन प्रदर्शित झाला असून त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील हृषिकेशच्या कामाचे सर्व प्रेक्षकांनी तसेच जगभरातील समीक्षकांनी खूप कौतुक केले. त्यामुळे दुसऱया सिझनमध्ये हृषिकेशच्या भूमिकेमध्ये काही अधिकचे चांगले बदल करून ती महत्वाची केली गेली आहे. दुसऱया सिझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरश: धमाल करणार आहे.
ब्रीदच्या पहिल्या सिझनमध्ये आर माधवन, तर दुसऱया सिझनमध्ये अभिषेक बच्चन यांच्या बरोबर दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेनन यांची देखील महत्वाची भूमिका आहे. ब्रीद या वेबसिरीजमध्ये प्रत्येक सिझनला प्रमुख भूमिकेतील व्यक्तिरेखा बदलत जातात. मात्र ज्या दोन व्यक्तिरेखा प्रत्येक सिझनमध्ये कायम राहणार आहेत त्या म्हणजे हृषिकेश जोशी (इन्स्पेक्टर प्रकाश) आणि अमित सध (इन्स्पेक्टर कबीर सावंत) यांच्या व्यक्तिरेखा. ब्रीद 2 हा सिझन ऍमॅझॉनवर प्राईम वर 10 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. या वेब सिरीजचा दुसरा सीझन पहिल्या सीझनप्रमाणेच मयांक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. भवानी अय्यर, विक्रम टुली आणि अर्षद सय्यद यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. मला जेव्हा पहिल्या सिझनसाठी बोलावले गेले तेव्हा माझ्यासाठी वेबसिरीज हे माध्यम नवीन होते. फारशी माहितीही नव्हती. पण हेच आता भविष्य असणार आहे, हे नक्की ठाऊक होते. त्यामुळे हे करायचे असे मी ठरवले. माझी ऑडीशन निर्माते, दिग्दर्शक यांना खूपच आवडली आणि या वेबसिरीजसाठी माझ्याकडून लगेच होकारही घेण्यात आला. पहिल्या सिझनला आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितले की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सिझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्वाची होत जाणार आहे आणि त्यानुसार दुसऱया सिझनमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली, असे हृषिकेश सांगतो. अलीकडे आम्ही सीझन दोनच्या भागांचे डबिंग करत होतो. त्यावेळी मला अभिषेक बच्चन म्हणाले की, या सिझनमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी व्यक्तिरेखा तुझी असणार आहे. ते म्हणाले कि, तुझी व्यक्तिरेखा हे या सीजनमधील सरप्राईझ पॅकेज असणार आहे. माझ्यासाठी ही सर्वात मोठी पोचपावती होती. या सिझनच्या चित्रिकरणादरम्यान माझी आणि अभिषेक बच्चन यांची खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकत्रच जेवायचो, सेटवर खूप क्रिकेट खेळायचो. खूप गप्पा मारायचो. ते खूप गप्पिष्ट आहेत, त्यांना गोड खूप आवडते आणि मलाही. त्यांनी एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनविलेला गाजराचा हलवा आणला होता. त्यांना मराठी कलाकारांबद्दल आणि मराठी रंगभूमीबद्दल प्रचंड आदर आहे, हृषिकेश सांगतो. हृषिकेश जोशीने आजचा दिवस माझा, मसाला, देऊळ, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, सायकल यांसारख्या अनेक पुरस्कार पटकावणाऱया चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच नांदी या वेगळय़ा नाटकाचे लेखन- दिग्दर्शन त्यांनी केले आहे. लग्नकल्लोळ, मु. पोस्ट बोंबील वाडी, शोभायात्रा, ए भाऊ डोकं नको खाऊ अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत.