दुसरी कसोटी दुसरा दिवस – लकमलचे 4, चमीराचे 3 बळी, लंकेच्या थिरिमनेचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड, अँटिग्वा-बर्बुडा
कर्णधार पेग ब्रेथवेटचे शतक (126), रहकीम कॉर्नवॉलचे (73) दुसरे कसोटी अर्धशतक यांच्या बळावर विंडीजने दुसऱया व शेवटच्या कसोटीच्या दुसऱया दिवशी पहिल्या डावात सर्व बाद 354 धावा जमविल्या. त्यानंतर दिवसअखेर लंकेने लाहिरु थिरिमनेच्या सलग तिसऱया अर्धशतकामुळे 3 बाद 136 धावांपर्यंत मजल मारली होती.
अँटिग्वा येथे झालेल्या पहिल्या अनिर्णीत कसोटीतील दोन्ही डावात 70 व 76 धावा जमविणाऱया थिरिमनेने दक्षिण आफ्रिका दौऱयापासून सुरू झालेला बहर या सामन्यातही कायम राखत 55 धावा जमविल्या. दिवसातील अखेरच्या सत्रात केमार रोशने त्याला बाद केल्यानंतर लंकेला आपला डाव मजबूत करण्याची गरज होती. दिनेश चंडिमल (नाबाद 34) व धनंजया डिसिल्वा (नाबाद 23) यांनी ही जबाबदारी पार पाडत दिवसअखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 59 धावांची भागीदारी केली होती.
त्याआधी, 7 बाद 287 या धावसंख्येवरून विंडीजने खेळ पुढे सुरू केला आणि आदल्या दिवशी नाबाद राहिलेल्या ब्रेथवेटने तिसऱयाच चेंडूवर एक धाव घेत नववे शतक पूर्ण केले. सलामीस आलेला ब्रेथवेट शेवटच्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. त्याने तब्बल साडेआठ तास मैदानावर राहत 311 चेंडूत 126 धावा जमविल्या. त्यात 13 चौकारांचा समावेश होता. त्याने अँकरची भूमिका चोखपणे पार पाडली आणि कॉर्नवॉलसमवेत आठव्या गडय़ासाठी 103 धावांची शतकी भागीदारी नोंदवत संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. कॉर्नवॉलने आधीच्या कसोटीत 61 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. ती त्याने मागे टाकत 73 धावा काढल्या. 92 चेंडूंच्या खेळीत त्याने 10 चौकार, 1 षटकार मारला. बेथवेट दुसऱयांदा अखेरपर्यंत नाबाद राहणार असे वाटत असतानाच त्याने चमीराच्या गोलंदाजीवर झेल दिला. यापूर्वी 2016 मध्ये शारजाह येथील पाकविरुद्धच्या कसोटीत तो अखेरपर्यंत नाबाद राहिला होता. लंकेतर्फे सुरंगा लकमलने 4, दुश्मंता चमीराने 3, फर्नांडो, एम्बुल्डेनिया, धनंजया डिसिल्वा यांनी एकेक बळी मिळविले.
लंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार दिमुथ करुणारत्ने 1 धाव काढून बाद झाल्यानंतर ओशादा फर्नांडो 18 धावांवर बाद झाला. थिरिमने अर्धशतकानंतर बाद झाल्यावर त्यांची स्थिती 3 बाद 77 अशी झाली होती. पण चंडिमल व डिसिल्वा यांनी दिवसअखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज प.डाव 111.1 षटकांत सर्व बाद 354 ः ब्रेथवेट 126 (311 चेंडूत 13 चौकार), कॅम्पबेल 5, बॉनर 0, मेयर्स 49 (61 चेंडूत 8 चौकार), ब्लॅकवूड 18, होल्डर 30 (34 चेंडूत 5 चौकार), जोशुआ दा सिल्वा 1, अल्झारी जोसेफ 29 (41 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), कॉर्नवॉल 73 (92 चेंडूत 10 चौकार, 1 षटकार), रोश 9, गॅब्रियल नाबाद 1, अवांतर 13. गोलंदाजी ः लकमल 4-94, चमीरा 3-69, धनंजया डिसिल्वा 1-26, फर्नांडो 1-71, एम्बुल्डेनिया 1-88). लंका प.डाव 61 षटकांत 3 बाद 136 ः करुणारत्ने 1, थिरिमने 55 (106 चेंडूत 6 चौकार), ओशादा फर्नांडो 18, चंडिमल खेळत आहे 34 (80 चेंडूत 5 चौकार), धनंजया डिसिल्वा खेळत आहे 23 (95 चेंडूत 1 चौकार), अवांतर 5. गोलंदाजी ः रोश 1-39, जोसेफ 1-31, काईल मेयर्स 1-6.