वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान विंडीजने खेळाच्या दुसरा दिवसाअखेर पाकिस्तानवर 34 धावांची आघाडी मिळविली. मात्र विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटचे शतक तीन धावांनी हुकले. विंडीजने पहिल्या डावात 8 बाद 251 धावा जमविल्या.
या कसोटीत पाकचा पहिला डाव 217 धावांत आटोपल्यानंतर विंडीजने 2 बाद 2 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळला पुढे प्रारंभ केला. कर्णधार ब्रेथवेट आणि जेसन होल्डर यांनी सहाव्या गडय़ासाठी 96 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केल्याने विंडीजला पाकवर आघाडी मिळविणे शक्य झाले.
पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजची एकवेळ स्थिती 5 बाद 100 अशी केविलवाणी होती. पाकच्या हसन अलीने चेसला 21 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर शाहीन आफ्रिदीने ब्लॅकवूडला 22 धावांवर झेलबाद केले. आफ्रिदीने मेयर्सला खाते उघडण्यापूर्वी पायचीत करून विंडीजवर अधिकच दडपण आणले. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत होल्डरने ब्रेथवेटला बऱयापैकी साथ देताना 108 चेंडूत 58 धावा झळकविल्या. अश्रफने होल्डरला झेलबाद केले.
कर्णधार ब्रेथवेटने 90 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याच्यावर अधिकच दडपण आले. एकेरी धाव घेण्याच्या नादात ब्रेथवेट हसन अलीच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. त्याने 221 चेंडूत 97 धावा जमविल्या. मोहम्मद अब्बासने रॉचला 13 धावांवर पायचीत केले. डिसिल्वा 20 तर वेरीकेन एका धावेवर खेळत होते. 87 षटकांत विंडीजने 8 बाद 251 धावा जमवित पाकवर 34 धावांची आघाडी मिळविली आहे. पाकतेर्फ मोहम्मद अब्बासने 3, शाहीन आफ्रिदीने 2 तर अश्रफ व हसन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव सर्वबाद 217, विंडीज प. डाव 87 षटकांत 8 बाद 251 (ब्रेथवेट 97, होल्डर 58, चेस 21, ब्लॅकवूड 22, डिसिल्वा खेळत आहे 20, रॉच 13, मोहम्मद अब्बास 3-42, शाहीन आफ्रिदी 2-59, अश्रफ 1-37, हसन अली 1-54).