ऑनलाईन टीम / लडाख :
चीनची टेहाळणी यंत्रणा आणि कॅमेरे असलेल्या ब्लॅक टॉप पोस्टवर 4 दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने कब्जा केला. त्यानंतर आता ब्लॅक टॉप जवळचा एक भाग इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) पथकाने ताब्यात घेतला आहे.
ITBP ने ताब्यात घेतलेला हा भाग रणनितीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. 4994 मीटर उंचीवर असलेल्या फुरचूकला पास येथून ITBP चे जवान आता ‘ब्लॅक टॉप’ जवळचा नव्या ठिकाणी पोहोचले आहेत. यापूर्वी आयटीबीपीचे जवान पँगाँग तलावाच्या उत्तरेकडील धानसिंग चौकीवर होते. हा परिसर फिंगर 2 आणि 3 जवळ आहे.
उंचावरील प्रदेश ताब्यात घेतल्याने पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप, यलो बम्पजवळच्या टेकड्यांवर भारतीय लष्कर, ITBP आणि स्पेशल फ्रंटियर फोर्स संयुक्तपणे तैनात आहेत.