जिल्हय़ात 33 जणांचा मृत्यू, 174 जण झाले पूर्णपणे बरे : सध्या 197 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या घटत चालली आहे. मात्र, गेल्या एक ते दीड महिन्यात ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली असून या संख्येने चारशेचा आकडा पार केला आहे. ब्लॅक फंगसने जिल्हय़ातील 33 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेचा सामना करताना
ब्लॅग फंगसचे संकटही उभे ठाकले. सुरुवातीला केवळ दहा ते बारा रुग्ण आढळून आले होते. ही संख्या आता 404 वर पोहोचली आहे. ब्लॅक फंगस बाधितांवर खासकरून सरकारी इस्पितळात उपचार करण्यात येत असून त्यासाठी गदग व हुबळी येथील डॉक्टरांची मदत घेतली जात आहे.
61 रुग्णांवर शस्त्रक्रिया
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आरोग्य अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक फंगसच्या 61 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 404 पैकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 242 जणांवर उपचार करण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर खासगी इस्पितळांमध्ये उपचार झाले आहेत.
सध्या जिल्हय़ात 197 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटल व खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
ब्लॅक फंगस बाधितांवर उपचारासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध असून गरज भासल्यास शस्त्रक्रियाही केली जात आहे. बिम्समध्ये सुरुवातीला व्यवस्था तोकडी होती.
प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी बिम्सच्या प्रशासकीय कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिस्थितीत बरीच सुधारणा करण्यात आली आहे. ब्लॅक फंगस बाधितांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी हुबळी येथील किम्समधून डॉक्टरांची सेवा घेण्यात आली आहे. याबरोबरच गदग वैद्यकीय महाविद्यालयातील पीजींची मदत घेतली जात आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असली तरी ब्लॅक फंगसचा धोका मात्र अद्याप कायम आहे.