नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
ब्लॅक फंगसवरील (म्युकरमायकोसिस) उपचारासाठी वापरण्यात येणाऱया इंजेक्शनचे उत्पादन आणि आयात करण्याची परवानगी देशातील सहा कंपन्यांना देण्यात आली आहे. भारत सीरम अँड व्हॅक्सिन लिमिटेड, बीडीआर फार्मास्युटिकल्स लिमिटेड, सन फार्मा लिमिटेड, सिप्ला लिमिटेड, लाईफ केयर इनोवेशन आणि माईलॅन लॅब्स या कंपन्यांकडून औषधनिर्मिती किंवा आयात केली जाणार आहे.
देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचे रुग्ण देशात वाढू लागले आहेत. आतापर्यंत जवळपास दहा हजार जणांना हा आजार झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तीला आजाराचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या आठ-पंधरा दिवसातच या रोगाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे सरकारने औषध निर्मिती आणि आयातीवर विशेष भर दिला आहे.
‘आयुष्यमान’ अंतर्गत मोफत उपचार करा !
‘ब्लॅक फंगस’संबंधी सोनिया गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र
देशात ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे आयुष्यमान भारत योजनेत या आजाराचा समावेश करून त्यावर मोफत उपचार व्हावेत अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. सोनिया गांधी यांनी पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांना आपल्या भावना कळवल्या आहेत.
ब्लॅक फंगसला महामारी घोषित केल्यास त्याच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व औषधांचा पुरवठा करणे आणि त्याच्या उत्पादनाची निश्चिती करणे आवश्यक आहे. तसेच या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जावेत. यासाठी आता केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे म्हणणे सोनिया गांधी पत्रात मांडले आहे.