सरकारकडून तज्ञांचा समावेश असणाऱया दोन समित्या नियुक्त
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासंबंधी मार्गसूची जारी करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या नेमल्या आहेत. या समित्या ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांवरील उपचार, मार्गदर्शन आणि देखभाल व्यवस्थेसंबंधी सरकारला सल्ले देणार आहे, अशी माहिती मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे.
ब्लॅक फंगसचे मूळ व चिकित्सा पद्धतींविषयी निर्णय घेण्यासाठी सरकारने व्हिक्टोरिया इस्पितळाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. अंबिका आणि राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सच्चिदानंद यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या नेमल्या आहेत. या समित्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्री डॉ. सुधाकर यांनी पत्रकारांशी बोलताना यासंबंधीची माहिती दिली.
दोन्ही समित्यांमधील तज्ञांशी दीर्घ चर्चा करण्यात आली आहे. उपचारासाठी दाखल होणाऱया कोरोनाबाधित रुग्णांना आठवडाभर अनावश्यक स्टेरॉईड्स न देण्याची विनंती आपण डॉक्टरांकडे करीत आहे. उपचार सुरू झाल्यानंतर दुसऱया आठवडय़ापासून स्टेरॉईड्स देता येतील. ते देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली, असे ते म्हणाले.
बेंगळूरसह राज्यातील इतर इस्पितळांमध्ये अशा रुग्णांमध्ये मधूमेह आढळून आल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. मधूमेहाचे प्रमाण अधिक असणाऱया कोरोनाबाधितांना अधिक प्रमाणात स्टेरॉईड्स दिल्याने ब्लॅक फंगस होत असल्याचे निदर्शनास आल्याचे तज्ञ समितीने सांगितले आहे. शिवाय मधूमेह व इतर व्याधी असणारे कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यासंबंधी मार्गसूची तयार केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित व्यक्ती संसर्गमुक्त झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्याआधी इएनटी तज्ञांकडून तपासणी, आवश्यकता भासली तर एमआयआर स्कॅन, डिस्चार्ज मिळाल्यानंतर आठवडय़ात संबंधित व्यक्तीने स्वतः जिल्हा इस्पितळातील चिकित्सा वॉर्डात आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही ते म्हणाले.