आरोग्य खात्याकडून आदेश : राज्यातील सहा इस्पितळांमध्ये उपचाराची व्यवस्था
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातही कोरोनाबाधितांना ब्लॅक फंगस होण्याचा धोका वाढला आहे. राज्यात आतापर्यंत 130 हून अधिक जणांमध्ये ब्लॅक फंगस आढळून आला आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या उपचारासंबंधी राज्य सरकारने मंगळवारी मार्गसूची जारी केली आहे. ब्लॅक फंगस आढळून येणाऱया रुग्णांवर 14 ते 21 दिवसांपर्यंत उपचार करावेत, अशी सूचना मार्गसूचीद्वारे देण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख 6 इस्पितळांमध्ये अशा रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सर्व इस्पितळांनी ब्लॅक फंगस आलेल्या कारोना रुग्णासंबंधीची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना द्यावी, असा आदेश आरोग्य-कुटुंब कल्याण खात्याने दिला आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या कोणत्याही इस्पितळाने उपचार नाकारू नये, असे आरोग्य खात्याने आदेश पत्रकात स्पष्ट केले आहे.
बेंगळूर मेडिकल कॉलेज, म्हैसूर मेडिकल कॉलेज, हुबळीतील किम्स हॉस्पिटल, गुलबर्गा मेडिकल कॉलेज, शिमोगा मेडिकल कॉलेज, मंगळूरमधील वेनलॉक हॉस्पिटल या ठिकाणी ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. डॉ. एच. एस. सतीश यांच्या अध्यक्षतेखाली अशा रुग्णांवर उपचार करण्याची पद्धत निश्चित करण्यात आली आहे.
कोविड रुग्णांना ब्लॅक फंगस झाल्यास बेंगळूरमधील व्हिक्टोरिया आणि मिंटो हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. व्हिक्टोरिया इस्पितळात नेफ्रो युरोलॉजी केंद्र, ट्रामा केअर, पीएमएसएसवाय हॉस्पिटलमध्ये देखील उपचार केले जात आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्यांना ब्लॅक फंगस झाल्यास बेंगळूर बौरिंग इस्पितळात उपचार केले जात आहेत.