नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या कोरोनापेक्षाही जास्त भीती ब्लॅक फंगस या विकारामुळे निर्माण झाली आहे. ज्या कोरोनाच्या रुग्णांना अनियंत्रित मधुमेह असेल त्यांना याची बाधा होण्याची शक्यता अधिक असते, असे तज्ञांचे मत आहे. तसेच कोरोना बरा होण्यासाठी स्टेरॉईडयुक्त औषधांचा उपयोग डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय केल्यासही ही बाधा होऊ शकते. तथापि आता एक नवे कारण पुढे येत आहे.
कोरोनामुळे आजारी असलेल्या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून त्यांना जस्तयुक्त (झिंक) औषधे, लोहयुक्त (आयर्न) औषधे आणि विषाणू नाशक (अँटीबायोटिक्स) औषधांचा उपयोग केला जातो. या औषधांच्या अतिउपयोगामुळेही ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असा नवा निष्कर्ष समोर आला आहे. मात्र यावर अधिक अभ्यासाची मागणी डॉक्टर्स आणि संशोधकांनी केली आहे. निश्चित धोरण नंतरच ठरविता येणार आहे.
भारतात सध्या ब्लॅक फंगसचे 8 हजार रुग्ण सापडले आहेत. यांपैकी काही जणांचा मृत्यू या बाधेमुळे झाला आहे. तर काहीजणांना डोळे व इतर अवयव गमवावे लागले आहेत. या फंगसचे रुग्ण भारतातच सर्वाधिक आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसमवेतच डॉक्टर्स व संशोधकांची चिंताही वाढली आहे. त्यामुळे देशात या विकारावर अधिक संशोधक करण्यात येत आहे.