केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन : पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळाचा रौप्य महोत्सव
प्रतिनिधी /तिसवाडी
भक्तिमहोत्सवासारख्या उपक्रमांतून समाजाचे उद्बोधन होत असते व अशा अनेक उपक्रमांव्दारे पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळ व कला आणि संस्कृतिक संचालनालय समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट कार्य करत आहे. थोर भजनी कलाकारांनी भजनाच्या माध्यमातून संस्कारांना महत्व न दिल्याने समाजाची स्थिती दासळलेली दिसते, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी पानवेल रायबंदर येथे केले.
पानवेलकर कला आणि सांस्कृतिक संस्थेने कला संस्कृती संचालनालयाच्या सौजन्याने पानवेल येथील श्री विठ्ठल मंदिरात आयोजित केलेल्या दिवसभराच्या भक्तीमहोत्सवाच्या समारोप सोहळय़ात श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होता.
यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे कला संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक अशोक परब, सांस्कृतिक अधिकारी गोविंद शिरोडकर, राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त फ्रान्सिस मार्टिन्स, आकाशीवो तावारिस, जुने गोवेचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य निळकंठ भोमकर, जेष्ठ कलाकार नितिन कोरगांवकर, देवस्थानचे अध्यक्ष सुदेश वळवईकर, पंच तुळशीदास कवळेकर, पानवेलकर कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संदिप नाईक आडपईकर, सचिव संदिप गणपत नाईक आदि उपस्थित होते.
यावेळी सदानंद राणे (शिक्षक), गजानन गोलतकर (संगीत, उद्योग व्यवसाय), मावारिसिवो फर्नांडिस (हस्तकला), जयसिंग आमोणकर (भजन व नाटक), विलास नाईक (अभिनय), या जेष्ठांना तसेच राजू भिकारो नाईक (पत्रकारिता व लेखक), सुदन फडते (भजन, तबला व पखवाजवादन), अशोक दत्ता नाईक (नाटय़अभिनय), अनिकेत जयकुमार आमोणकर (अभिनय व मॉडेलिंग), भालचंद्र उसगांवकर ( नाटक, दिग्दर्शन व समाजकार्य), मनाली महेंद्र प्रियोळकर (अभिनय) या युवा कलाकारांना त्यांच्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युवा सृजन पुरस्काराचे मानकरी ठरलेले संदेश सोनू नाईक (चित्रकला), सोहन उदय कवळेकर (क्रीडा), वसंत अशोक गावकर (संवादिनीवादन) व साईल गोपाळ नाईक (ध्वनिसंयोजन) यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना अशोक परब म्हणाले की, ही संस्था विविध कलांच्या जतन संवर्धनासाठी प्रयत्न करत असून संस्थेने असेच कार्य पुढे न्यावे. नीळळकंठ भोमकर यांनी सांगितले की, सोमनाथबुवांसारखे पूर्वीच कलाकार प्राप्ती काय होईल हा विचार करत नव्हते तर त्यांनी कलेसाठी जीवन वाहून घेतले. सचिव संदिप गणपत नाईक यांनी स्वागत केले.
यावेळी पुरस्कारप्राप्त पत्रकार राजू भिकारो नाईक, संगीतज्ञ गजानन गोलतकर यांची सत्काराला उत्तर देणारी भाषणे झाली. संजय मिसर यांनी सुत्रसंचालन केले. सुरत च्यारी यांनी युवा पुरस्कार प्राप्त कलाकारांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन महेंद्र बांदोडकर यांनी मानले.
पं. सोमनाथबुवा च्यारी पुरस्काराचे पहिले मानकरी सुहास्य च्यारी
भजनाचार्य पं. सोमनाथबुवा च्यारी स्मृती, हा यंदापासून त्यांच्या शिष्यासाठी घोषित केलेला पुरस्कार त्यांचे सुपुत्र सुहास्य सोमनाथ च्यारी यांना प्राप्त झाला. बाबांच्या नावाचा पहिला पुरस्कार मला लाभला याबद्दल आनंद व्यक्त करून, सुहास्य च्यारी यांनी बाबांच्या भजन कार्यक्रमात साथसंगत केली. याचा अभिमान वाटतो, असे सांगितले. आम्हा मुलांपेक्षा आपल्या विद्यार्थ्यांवर त्यांनी जास्त लक्ष केंद्रीत केले. त्यांचा वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आता आम्हाला उचलायची आहे.