शाहरुख खान सध्या अमली पदार्थांप्रकरणी पुत्र आर्यनच्या अटकेवरून चचेंत आहे. तरीही त्याची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट स्वतःच्या आगामी चित्रपटावर लक्ष केंद्रीत करत आहे. शाहरुख स्वतःच्या प्रॉडक्शन अंतर्गत ‘भक्षक’ चित्रपटातची निर्मिती करत आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री भूमी पेडणेकरची एंट्री झाली आहे.
भक्षकमध्ये भूमीची निवड एका पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी करण्यात आल्याचे समजते. इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राइम थ्रिलर चित्रपट असलेल्या भक्षकचे चित्रिकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी प्रथम अभिनेता अर्जुन कपूरला विचारणा करण्यात आली होती. पण अर्जुन अन्य चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने हे शक्य झाले नव्हते. त्यानंतर निर्मात्यांनी मुख्य व्यक्तिरेखेत बदल करत चित्रपट नायिकाप्रधान केला.
या चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकित करणार आहे. त्यानेच याची पटकथा लिहिली आहे. जानेवारीमध्ये याचे चित्रिकरण सुरू होऊ शकते. बिहारमधील वादग्रस्त मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरणावर आधारित हा चित्रपट असल्याचे समजते. या शेल्टर होममध्ये राहत असलेल्या मुलींवर बलात्कार तसेच त्यांच्या हत्येचे प्रकरण काही वर्षांपूर्वी उघडकीस आले होते.