ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांनी आज पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी मान यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपचे नेते उपस्थित होते.
भगवंत मान यांनी शहीद भगत सिंग यांचे मूळगाव खटकड कलां येथे पंजाबी भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी बोलताना मान म्हणाले, वेळ आणि जनता ही मोठी गोष्ट आहे. माणसाला जमिनीवर आणायला ती उशीर करत नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेती, व्यवसाय, शाळा, रुग्णालये सर्व काही व्यवस्थित होईल. येथे राहूनच आम्ही पंजाबचे भले करू. आपण जनतेसारखे आहोत आणि जनता म्हणून काम करत राहणार. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा अहंकार करू नये, असेही त्यांनी सांगितले.
हा भव्य शपथविधी सोहळा 100 एकराच्या परिसरात झाला. यातील 44 एकरवर मंडप उभारण्यात आला होता. त्यांच्या शपविधी सोहळय़ाला जवळपास 2 लाख नागरिक उपस्थित होते. सोहळय़ाच्या सुरक्षेसाठी आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.