सांगली : प्रतिनिधी
भगवान महावीर यांच्या २६२९ व्या जन्मकल्याणनिमित्त रविवार दि. 14 रोजी सर्व जैन बांधवांच्यावतीने मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन राहूल महावीर चौगुले, अचलगच्छ देहरासारचे अध्यक्ष जे. पी. छेडा व जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासर ट्रस्टचे चेअरमन सुभाष शाह यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी सतीश आरवाडे, प्रशांत पाटील-मजलेकर, राहुल चौगुले, दिलीपभाई रेठरेकर, जतीनभाई शाह, विपुलभाई मेहता , महावीर भन्साली, रोहन मेहता, जितेन्द्र जैन, भारती चौधरी, अनिता पाटील, प्रविण वाडकर, राजेश पाटील, संदीप हिंगणे आदी उपस्थित होते.
दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ठिक ७.३० वाजता निघणाऱ्या मिरवणुकीत रथ, घोडे, मेरु, पारंपरिक वाद्ये, भ. महावीरांची प्रतीमा, घोषवाक्ये आदिंचा समावेश असणार आहे. यावेळी सर्वांनी १२ वाजेपर्यंत आपले व्यवहार बंद ठेवावेत. तसेच मिरवणुकीमध्ये पुरुष, मुले यांनी पांढरी शुभ्र वस्त्रे, तर श्राविकानी केसरी वस्त्रे परिधान करून या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ही मिरवणुक श्री जेठाभाईवाडीपासून सुरु होऊन हायस्कुल रोड, गणपतीपेठ, टिळक स्मारक मंदिर, हरभट रोड, महानगरपालिका रोड, राजवाडा चौक, रॉकेल लाईन श्रीमती कळत्रे आक्का जैन महिलाश्रम, भ. आदिनाथ जिनमंदिर, महावीरनगर सांगली या मार्गाने जाऊन श्री. जेठाभाईवाडी येथे विसर्जित होईल.
तसेच कच्छी जैन भवन येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी सिव्हील हॉस्पीटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमांड होम येथे अन्नदान व फळ वाटप केले जाणार आहे. या विविध कार्यक्रमात सर्व जैन धर्मिय स्त्री पुरुष, मुली व मुले यांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.