प्रतिनिधी /बेळगाव
कोरे गल्ली येथील समितीनिष्ट मराठी भाषिकांनी मतदान करण्यापूर्वी आपल्या घरांवर सीमाप्रश्नाची शान असलेला भगवा ध्वज फडकवला आणि मतदान केले. परंतु त्यामुळे प्रशासनाचे पित्त खवळले आणि पोलिसांनी भगवा काढण्यासाठी दबाव आणला. परंतु कोरे गल्लीतील मराठी भाषिकांनी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. भगवा ध्वज हा मराठी अस्मितेचे प्रतीक आहे, असे कार्यकर्त्यांनी पोलिसांना सुनावले.
यानंतर सर्व समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी ‘मराठी भाषिकांच्या एकजुटीचा विजय असो’, बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा दिल्या.