कोरोनाबाधितांची संख्या एकूण आठवर : जमावबंदीचा कालावधी वाढविला
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील भटकळ येथे मंगळवारी कोरोनाचा आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे जिल्हय़ातील रुग्णांची संख्या आता 8 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण भटकळ येथे आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन येथे बारीक नजर ठेऊन आहे. मागील आठवडय़ात 20 मार्च रोजी पॉझिटिव्ह आढळलेला 26 वर्षीय युवक दुबईहून गोवामार्गे भटकळमध्ये आला होता. त्याला येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. त्या युवकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
मंगळवारी लागण झालेल्या युवकाला उपचारासाठी येथून जवळच्या अरगा येथील आयएनएस पतंजली रुग्णालयात दाखल केले आहे. मागील सर्व सात रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. अशोक कुमार यांनी दिली आहे.
घरोघरी जाऊन उपचार
भटकळ येथे आजअखेर कोविड-19 चे आठ रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी अन्य प्रकारच्या रुग्णांनाही घराबाहेर पडून उपचार घेणे कठीण होऊन बसले आहे. रुग्णांची समस्या ओळखून जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा 14 एप्रिलपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
ड्रोनद्वारे देखरेख
कडक सूचना देऊनही जिल्हय़ातील काही ठिकाणी नागरिक विशेष करून युवक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून आले आहे. अशा युवकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन कॅमेऱयांचा वापर केला जात आहे. जिल्हय़ातील दांडेली, कारवार, शिरसी आणि भटकळ येथे हे कॅमेरे युवकांच्या हालचालीवर नजर ठेऊन आहेत.
जमावबंदीच्या कालावधीत वाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवार जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार के. यांनी मंगळवारी जिल्हय़ात जमावबंदीचा आदेश लागू केला होता. तथापि जिल्हय़ातील परिस्थिती अपेक्षित प्रमाणात नियंत्रणाखाली न आल्याने जमावबंदीच्या कालावधीत वाढ केली आहे. पुढील आदेशापर्यंत जमावबंदीचा आदेश लागू राहणार आहे, असे कळविण्यात आले आहे.