उर्दू भाषिक नगरसेवकांकडून निषेध : पोलिसांचा कडक बंदोबस्त, नगरपरिषदेला घेराव घालण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकाऱयांनी घेतली बैठक
प्रतिनिधी /कारवार
जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस यांच्या उपस्थितीत मोठय़ा पोलीस बंदोबस्तात भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीवर उर्दू भाषेत लिहिण्यात आलेला तो फलक शेवटी हटविण्यात आला. दरम्यान, भटकळ नगरपरिषदेचे अध्यक्ष परवेज काशीमजी आणि उर्दू भाषिक नगरसेवकांनी फलक हटविण्याच्या घटनेचा निषेध केला असून उर्दू भाषेतील फलकासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या उर्दू भाषेतील फलक वादंगावर अद्याप अखेरचा पडदा पडलेला नाही, असे म्हणायला हरकत नाही.
जिल्हय़ातील अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱया भटकळमधील उर्दू भाषेतील फलकाबद्दल अधिक माहिती अशी, भटकळ नगरपरिषदेच्या इमारतीच्या रंगरंगोटीनंतर कन्नड, इंग्रजी आणि उर्दू या तीन भाषेत फलक लावण्यात आला होता. ही बाब भटकळ येथील कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच उर्दू फलक तातडीने हटविण्याची मागणी करण्यात आली होती. परंतू उर्दू भाषिकांनी कोणत्याही परिस्थितीत फलक हटवायला देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. उर्दू फलकाच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरलेल्या उर्दू भाषिकांनी नगरपरिषद इमारतीकडे धाव घेऊन घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कन्नड आणि उर्दूप्रेमी एकमेकांसमोर ठाकल्याने वेगवेगळय़ा कारणामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱया आणि अतिसंवेदनशील नगर म्हणून ओळखल्या जणाऱया भटकळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान बेंगळूर येथील एका कन्नड संघटनेच्या म्होरक्याने उर्दू भाषेतील फलक वेळीच हटविण्यात आला नाही तर फलक उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱयांचा हस्तक्षेप
फलकाच्या मुद्यावरून भटकळमधील सामाजिक स्वास्थ्य बिघडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी मलई मुगीलन गुरुवारी भटकळ येथे दाखल झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. सुमन पेडणेकर, भटकळचे असिस्टंट कमिशनर आणि अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर जिल्हाधिकाऱयांनी नगरपरिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक आणि भटकळ येथील मुस्लीम बांधवांची सर्वोच्च संस्था ‘तंजीम’च्या नेत्यांबरोबर बैठक घेतली.
पोलीस बंदोबस्तात हटविला फलक
बैठकीवेळी जिल्हाधिकाऱयांनी सरकारी कार्यालय इमारतीवरील फलक कन्नड आणि इंग्रजी वगळता अन्य भाषांमध्ये लिहिण्यास वाव नाही असे पटवून दिले. त्यानंतर मुगीलन यांनी मुख्याधिकारी एम. के. सुरेश यांना इमारतीवरील उर्दू फलक हटविण्याचा आदेश दिला. सुरेश यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांच्या मदतीने फलकावरील उर्दू शब्द हटविले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भटकळचे डीवायएसपी के. यु. बेळीयप्पा, नगर ठाण्याचे निरीक्षक दिवाकर परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते. दरम्यान कन्नड भाषिक नगरसेवकांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे स्वागत केले.
उर्दू फलकासाठी न्यायालयीन लढा लढणार…
जिल्हाधिकाऱयांच्या फलक हटविण्याच्या आदेशामुळे उर्दू भाषिकांमध्ये नाराजी वाढीला लागली आहे. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानंतर उर्दू भाषेतील फलक हटविल्यानंतर नगरपरिषदेची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी निषेध केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष परवेज काशीमजी म्हणाले, नामफलक कायद्यानुसार कन्नड, इंग्रजी भाषेनंतर उर्दूमध्ये लिहिण्यात आला होता. असे केल्याने कोणत्याही प्रकारची चूक झाली नव्हती. कर्नाटक लोकल ऍथारिटी ऍक्ट 1981 नुसार एखाद्या प्रदेशात शेकडा 15 पेक्षा अधिक संख्येने अल्पसंख्याक भाषिक वास्तव्य करून असल्यास त्या भाषिकांच्या सोयीसाठी स्थानिक भाषेत फलक लिहिले पाहिजेत. भटकळनगरातील उर्दू भाषिकांच्या टक्केवारीनुसार नामफलक लिहिण्यात आला होता. तथापि काही जणांचा याला विरोध होता. नगरपरिषदेच्या प्रशासनावर दबाव आणून फलकावरील उर्दू भाषा हटविण्यात आली आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो, असे सांगून काशीमजी म्हणाले, आता आम्ही निदर्शने करणार नाही. त्याऐवजी उर्दू भाषेच्या सन्मानासाठी न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार आहोत.