प्रतिनिधी/ कारवार
जिल्हय़ातील भटकळ येथील सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे कर्नाटक सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱया आरोग्य बुलेटिनकडून रविवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. लागण झालेल्यांमध्ये दोन महिलांचा (वय 21 आणि 50) व पाच पुरुषांचा (वय 15, 16, 31, 42, 60) समावेश आहे. गेल्या शुक्रवारी भटकळ येथे 12, शनिवारी 8, रविवारी 7 कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हय़ातील बाधितांची संख्या 1 वरून 28 वर गेली आहे. या सर्वांवर उपचारासाठी येथील कर्नाटक इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये सज्ज करण्यात आलेल्या खास वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. भटकळ येथील 11 रुग्ण बरे होऊन यापूर्वीच घरी परतले आहेत.
त्या युवतीचा संपर्क अनेकांना महागात पडत आहे
4 मे पर्यंत जिल्हय़ातील कोरोनावर उपचार घेणाऱयांची संख्या शून्य होती. 5 तारखेला 18 वर्षीय युवतीला (प्रकरण क्रमांक 659) लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्या युवतीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या स्वॅबची तपासणी केली असता आजअखेर 25 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यामध्ये शुक्रवारच्या 12, शनिवारच्या 6 आणि आजच्या सात नागरिकांचा समावेश आहे.
रिक्षा चालकालाही लागण
1 मे रोजी 42 वर्षीय (आज आढळून आलेला रुग्ण) रिक्षा चालक त्या युवतीला रिक्षामधून उपचारासाठी रुग्णालयाला घेऊन गेला होता. त्या रिक्षा चालकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. आता त्या रिक्षा चालकाच्या कुटुंबीयाच्या अहवालाकडे लक्ष लागून राहिले आहे.