वार्ताहर/ कराड
कराड शहरात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. इशिता प्रशांत कांबळे (वय 6, रा. बुधवार पेठ) व शिवेंद्र आनंद कदम (वय 5, रा. मंगळवार पेठ) अशी जखमी बालकांची नावे आहेत. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटल यथे पाठवण्यात आले.
कराड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्याने नागरिकांत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. शहरातील अनेक भागात कुत्र्यांची टोळकी फिरत असल्याने दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेकेडे शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही.
सोमवारी सकाळी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने बुधवार पेठेतील इशिता कांबळे ही बालिका जखमी झाली आहे. तिच्या तोंडाला, कानाला व खांद्याला कुत्र्याने चावा घेतला आहे. तर शिवेंद्र कदम याच्या मांडीला चावा घेतला आहे. उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी सातारा सिव्हील हॉस्पिटल येथे पाठवण्यात आल्याचे उपजिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.
अन्यथा मुख्याधिकाऱयांच्या कार्यालयात कुत्री सोडणार
शहरातील रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. याचा नागरिक, महिला व बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करुनही भटक्या कुत्र्यांचा अद्याप बंदोबस्त झालेला नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पालिकेने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदेबस्त करावा अन्यथा मुख्याधिकाऱयांच्या कार्यालयात भटकी कुत्री साडण्याचा इशारा दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील यांनी दिला आहे.