रास्त धान्य दुकानाचीही नासधूस, पोलीस स्थानकासह तहसीलकडे तक्रार
प्रतिनिधी/ दापोली
तालुक्यातील भडवळे येथील रास्त धान्य दुकान चालकास मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दुकान चालक काशिनाथ लोंढे यांनी दापोली पोलीस स्थानकासह तहसील कार्यालयात तक्रार दिली आहे. तसेच चौघाजणांनी रास्तधान्य दुकानाचीही नासधूस केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
या बाबत लोंढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भडवळे येथील रास्त धान्य दुकान चालवतात. मात्र काही ग्रामस्थांच्या त्रासामुळे त्यांनी 14 ऑक्टोबर 2019 रोजी तहसीलकडे राजीनामा दिला होता. त्यानंतर सर्व रास्तधान्य कार्डधारकांच्या बैठकीत हा राजीनामा मंजूर करण्यात आला होता. मात्र यानंतर पुन्हा हे रास्तधान्य दुकान लोंढे यांच्याकडे चालवण्यासाठी देण्यात आले. दरम्यान, 18 जुलै रोजी सायंकाळी 6 वा. तुषार खांबे, रूशाळ खांबे, तेजल खांबे, तानाजी खांबे यांनी लोंढे व त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच रास्त धान्य दुकानात येऊन दुकानाची नासधूस केली. या व्यक्ती पुणे-उसवाडीमध्ये राहतात. त्यामुळे कार्डधारकांच्या तक्रारी नसताना त्यांनी कार्डधारकांकडे जाऊन, तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य किती मिळाले, या बाबत चौकशी केली. रेशनिंग कार्ड देत नसतानाही त्यांच्याकडून मागून घेतले. तुषार खांबे यांच्याशी जागा जमिनीवरून वाद न्यायालयात चालू आहे. त्यामुळे खांबे रास्तधान्य दुकानाबाबत गैरसमज पसरवत आहेत. यातूनच हा प्रकार घडल्याचे लोंढे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून न्याय देण्याची मागणी लोंढे यांनी तहसील कार्यालयाकडे केली आहे. तसेच वर नमूद केलेल्या व्यक्तींपासून संरक्षण मिळेपर्यंत ऑगस्ट महिन्याचा धान्य भरणा करणार नसल्याचे तक्रारीत स्पष्ट केले आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एम. जी. हळदे करीत आहेत.