ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवंगत अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आज इंदौर येथील सेशन्स कोर्टात अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणात भय्यू महाराजांचे मुख्य सेवक विनायक दुधाले, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक यांना दोषी ठरवत प्रत्येकी 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील आरोपी भय्यू महारांची संपत्ती हडपण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी महाराजांची संपत्ती हडपण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं होतं. पलक पुराणिक या केअरटेकर महिलेने महाराजांचे अश्लील व्हिडिओ बनवले होते. हेच व्हिडिओ दाखवून भय्यू महाराजांना हे तिन्ही आरोपी धमकी देत होते. त्यामुळे भय्यू महाराज प्रचंड खचले होते. त्यातूनच त्यांनी 12 जून 2018 मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणाचा तपास करत असताना महाराजांचे मुख्य सेवक विनायक दुधाले, चालक शरद देशमुख आणि केअरटेकर पलक पुराणिक दोषी आढळले. त्यांच्यावर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कोर्टाने तिन्ही आरोपींना भारतीय दंड संहिता कलम 306 नुसार दोषी ठरवत प्रत्येकी 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.