भारतीय लष्करासह चीनच्या माध्यमांनी दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय सीमेत घुसलेल्या चीनच्या सैनिकाला भारतीय लष्कराने परत केले आहे. चिनी सैनिक डेमचोक सेक्टरमध्ये भरकटून भारतीय सीमेत घुसला होता. त्याला तपासानंतर शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) पुन्हा चिनी लष्कराच्या ताब्यात देण्यात आले आहे. चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यासंबंधीचे अधिकृत वृत्त जारी केले आहे. तसेच पकडलेल्या सैनिकाला प्रोटोकॉलनुसार लडाखमध्ये चुशूल-मोल्डो बैठक स्थळावर चिनी अधिकाऱयांकडे सोपवण्यात आल्याचे भारतीय लष्करानेही सांगितले.
लडाखच्या चुमार-डेमचोक परिसरात एका चिनी सैनिकाला भारतीय जवानांनी सोमवारी पकडले होते. वँग या लाँग असे नाव असलेल्या या सैनिकाला ताब्यात घेत भारतीय सैन्याने त्याची चौकशी सुरू केली होती. हा सैनिक चुकून सीमारेषा पार करून आला असावा अशी शक्यता लष्कराने सुरुवातीला वर्तवली होती. तथापि, शिष्टाचारानुसार पूर्ण चौकशी करूनच त्याला सोडून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. तसेच पकडलेल्या पीएलए सैनिकाला ऑक्सिजन, जेवण आणि उबदार कपडय़ांसह वैद्यकीय सेवाही पुरविण्यात आली होती.