खासगी डॉक्टरकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले
प्रतिनिधी/ खेड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळले जात नसल्याने दवाखान्यास बजावलेली कारवाईची नोटीस रद्द करण्यासाठी 7 हजार रूपयांची लाच स्वीकारणारा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी व भरणे ग्रामपंचायतीचा प्रशासक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकला. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास वेरळनजीक एका हॉटेललगत हा प्रकार घडला असून भरणे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाचाही यात समावेश आहे. जिल्हय़ात ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीनंतर अवघ्या महिन्याभरातच लाचखोर प्रशासक जाळय़ात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
भरणे येथे देवानंद रामलाल मासरकर (52, रा. भरणे) या लाचखोर प्रशासकासह सुनील सीताराम चिले (40, भरणे-घडशीवाडी) असे माजी सरपंचाचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा भरणे येथे खासगी दवाखाना आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने वैद्यकीय व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करून सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची तोंडी तक्रार ग्रामस्थांनी केल्याचे सांगत 23 सप्टेंबर रोजी दवाखान्यास नोटीस बजावण्यात आली होती. या बाबतचा खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्याची तंबी या लाचखोर प्रशासकाने तक्रारदारास दिली होती.
नोटीसनुसार कारवाई न करण्यासाठी लाचखोर प्रशासकाने तक्रारदाराकडे 20 हजार रूपयांची लाच मागितली होती. त्यातील 10 हजार रूपये स्वीकारत उर्वरित 10 हजार रूपये न दिल्यास पुढील कारवाई अटळ असल्याचे तक्रारदारास सांगितले. या बाबत खासगी डॉक्टरने 28 रोजी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. 10 हजार रूपयांच्या रक्कमेऐवजी तडजोडीनंतर 7 हजाराची मागणी केली. स्वत:साठी 5 हजार तर सुनील चिले याच्यासाठी 2 हजार रूपये असे 7 हजाराची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नितीन विजयकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, पोलीस नाईक विशाल नलावडे, योगेश हुंबरे, पोलीस शिपाई हेमंत पवार यांनी केली. जिल्हय़ात बहुतांश ग्रामपंचायतीचा 5 वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. तालुक्यात 87 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे. अवघ्या महिनाभरातच जिल्हय़ातील पहिला लाचखोर प्रशासक खेडमध्ये सापडल्याने प्रशासक पदामुळे काहीजणांना लाचखोरीचे नवे कुरण मिळाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.