बंदोबस्ताची मागणी, वनविभागाने लावले कॅमेरे
प्रतिनिधी / नागठाणे
भरतगाववाडी (ता. सातारा) येथे गेले सहा महिन्यांपासून सुरु असलेला बिबट्याचा वावर अद्यापही कायम आहे.त्यामुळे येथील ग्रामस्थांमधील बिबट्याचे भयदेखील संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने नुकतेच बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कॅमेरे लावले आहेत.
परिसरातील भरतगाववाडी गावालगतच्या डोंगरक्षेत्र परिसरात गेले सहा महिन्यांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. गेल्या काही दिवसांत या बिबट्याने शिवारात असलेल्या वस्तीवरील पाळीव कुत्र्यांना आपले लक्ष्य बनविले आहे.तर बोरगावच्या डोंगरक्षेत्रात असलेल्या शिवाराठी शेळ्या फस्त करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
अलीकडेच पिकास पाणी देण्यासाठी जाणाऱ्या श्रीकांत मोहिते, प्रकाश पवार या शेतकऱ्यांना अगदी काही अंतरावरच बिबट्याचे दर्शन झाले. या वेळी बिबट्याने वस्तीवरील एक पाळीव कुत्रा तोंडात धरलेला होता. मात्र प्रसंगावधान राखून या दोघांनी दुचाकीची हेडलाईड लावून हॉर्नचा मोठा आवाज केल्यामुळे बिबट्याने भक्ष्य सोडून तिथून पलायन केले. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागास दिली होती. ग्रामपंचायतीमार्फतही निवेदन देण्यात आले.
त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कुशल पावरा, भरतगाव विभागाचे वनरक्षक राज मोसलगी यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याच्या पावलांची पाहणी केली. घटनेनंतर परिसरात वन विभागाने दोन कॅमेरे लावले आहेत. या वेळी तंटामुक्ती गाव समितीचे माजी अध्यक्ष जयवंत बागल, प्रकाश पवार, श्रीकांत मोहिते, प्रसाद घाडगे, अक्षय घाडगे, अतुल पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शिवारात जाताना शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही वनाविभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांत संभ्रमाचे वातावरण
अलीकडेच पुणे- बंगळूर महामार्गावर खिंडवाडी ते शेंद्रे या गावांदरम्यान अनोळखी वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कदाचित त्याच बिबट्याचा वावर भरतगाववाडी परिसरात असण्याची शक्यता ग्रामस्थांतून व्यक्त होत होती. मात्र संबंधित बिबट्याच्या मृत्यूनंतर पुन्हा शिवारात कुत्र्यावर हल्ल्याची घटना घडली. त्यामुळे अद्यापही बिबट्याचा वावर सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.