प्रतिनिधी/ नागठाणे
- राज्यातील पहिला उपक्रम
- बचतगटाच्या माध्यमातून ३ बसची खरेदी
सैनिक सीमेवर देशसेवा करतात. प्राणाची बाजी लावताना दिसतात. त्यांच्या पत्नी यादेखील संसाराचा गाडा समर्थपणे हाकताना दिसतात. त्याचीच प्रचिती देताना सैनिकांच्या पत्नींनी एकत्र येत बचतीचा आदर्श निर्माण केला आहे. बचतगटांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे ४० बस खरेदी केल्या आहेत. राज्यातील हा पहिलाच उपक्रम मानला जात आहे.
काळाच्या बदलत्या प्रवाहात महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींनीही असाच आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी बचतगटाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. भरतगाववाडी (ता. सातारा) येथील माजी सैनिक अन् पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकात पडवळ यांनी या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली.
राज्यातील माजी सैनिकांच्या पत्नी व विधवा सैनिक पत्नी यांच्या बचतगटांत ६०० हून अधिक महिलांचा समावेश आहे. यामध्ये भरतगाववाडी (ता.सातारा) येथील ३ बचतगटाच्या माध्यमातून ३३ महिला या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.हे बचतगट साताऱ्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर, नगर, वाशीम जिल्ह्यात कार्यरत आहेत. या बचतगटांतील महिलांनी ४० हून अधिक बस खरेदी केल्या आहेत. यामध्ये भरतगाववाडी येथील ३ बसेसचा समावेश आहे.बैंक ऑफ महाराष्ट्रने यासाठी अर्थपुरवठा केला आहे.त्यापुढे जात या बस पीएमपीला भाडेतत्त्वावर पुरविल्या जाणार आहेत.
या बसचा लोकार्पण कार्यक्रम भरतगाववाडी (ता. सातारा) येथे झाला.महाराष्ट्र राज्याचे
सैनिक कल्याण विभागाचे कर्नल आर. आर. जाधव,जिल्हा सैनिक कल्याण विभाग ,साताराचे कमांडर व्ही. बी. पाटील, बैंक ऑफ महाराष्ट्राचे झोनल अधिकारी सुमित कुमार,नागठाणेचे शाखाधिकारी श्री.सोनावणे,माजी पंचायत समिती उपसभापती सूर्यकांत पडवळ, सुभेदार रमेश वाघ,रमेश वाघ, दिलीप वाघ, अर्जुन पवार, सुधाकर बर्गे, पोपट पडवळ आदींच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. जिल्हा सैनिक अधिकारी सुभेदार विलास घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमास सर्व आजी- माजी सैनिक,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*जिल्ह्यातील १७ बसचा समावेश*
या उपक्रमात जिल्ह्यातील बचतगटांचा मोठा सहभाग आहे. भरतगाववाडी, खिंडवाडी (प्रत्येकी ३), चिखली- मसूर, सातारा शहर, चिंचणेर (प्रत्येकी २), संभाजीनगर, पाडळी, शिवथर, जैतापूर, अंगापूर (प्रत्येकी १) अशा एकूण १७ बसचा समावेश आहे.
विश्वयोद्धा मल्टिट्रेड प्रा.ली.मार्फत या सर्व बसेस पी.एम.पी.एम.एल शी करारबद्ध केल्या गेल्या आहेत.माजी सैनिक पत्नी व विधवा सैनिक पत्नींच्या आर्थिक उन्नती व सबलीकरणासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम असून यात माझ्या गावातील ३ महिला बचतगटांचा समावेश आहे.भविष्यात या बससेसचे येणारे उत्पन्न हे त्या त्या बचतगटाच्या खात्यावर जमा होणार असून त्याचा लाभ या सहभागी सर्व माता-भगिनींना होणार आहे.लवकरच या उपक्रमाची व्याप्ती वाढवणार आहे.
– सूर्यकांत पडवळ
(माजी सैनिक व माजी पं. स.उपसभापती, भरतगाववाडी,ता.सातारा)-