कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी / कराड
दोन भावंडांना आर्मीमध्ये भरती करण्याच्या बहाण्याने 3 लाख 61 हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी दोघांवर कराड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदिप चित्राव तरडे ( वय 45 रा. वाई ता. वाई. जि. सातारा ) यांनी कराड ग्रामिण पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदिप तरडे यांचे पुतणे श्रीकांत तरडे व श्रीधर तरडे (वय 20) हे आर्मी भरतीची तयारी करत आहेत. कराड तालुक्यातील आक्काईचीवाडी येथील दादासाहेब रामचंद्र चिकाटे याने पुतण्यास आर्मी भरती करण्यासाठी सहा लाख द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर सदानंद बाणे यांना कोल्हापूर येथे जाऊन भेटावे लागेल असेही सांगितले. त्यानुसार तरडे वेळोवेळी पाच लाख दहा हजार रूपये दोघांना दिले.
मात्र त्यांनी भरती प्रक्रियेत मदत करण्यास टाळाटाळ केली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरडे यांनी पैशाची मागणी सुरू केली. संशयितांनी त्यांना 1 लाख 49 हजार परत दिले. मात्र उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तरडे यांनी बुधवारी कराड ग्रामिण पोलिसात फिर्याद दाखल केली.