मडगावातील खळबळजनक घटना, ज्वेलरने हल्लेखोरांशी केला संघर्ष, तरीही हल्लेखोर पसार
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ‘मेसर्स कृष्णी ज्वेलर्स’ या आस्थापनाचे मालक स्वप्नील वाळके (35 वर्षे) यांचा त्यांच्या सराफी दुकानात भरदुपारी लुटेऱयांकडून गोळी झाडून आणि सुऱयाने भोसकून खून करण्यात आला. दुकानातील दागिन्यांची चोरी करण्याच्या हेतूनेच हा खून करण्यात आला असावा आसा प्राथमिक अंदाज आहे. गोवाभर या खुनाचे पडसाद उमटले असून मडगाव पोलिसांपुढे एक आव्हान म्हणून हे प्रकरण उभे राहिले आहे. रात्री उशिरा पोलिसांनी याप्रकरणी सातजणांना ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास खुनाची ही घटना घडली. मडगाव पोलिसांना दुपारी 12.48 वाजता या खुनासंबंधी माहिती मिळाली. ‘सपना प्लाझा’ इमारतीजवळील सराफी दुकानात खून झाल्याची माहिती फोन करणाऱयाने पोलिसांना दिली होती.
मडगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दुकानाचे मालक स्वप्नील वाळके गंभीररित्या जखमी झालेल्या स्थितीत आढळले. त्यांना तातडीने मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्यात आले. मात्र इस्पितळात नेले तेव्हा तेथे डय़ुटीवर असलेल्या डॉक्टरांनी ‘मृतावस्थेत आणले’ अशी टिपण्णी नोंद केली.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे हल्लेखोरांचा शोध सुरु
या दुकानात तसेच दुकानाबाहेर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले होते. आरोपींची ओळख पटविण्यासाठी हे दोन्ही कॅमेरे आणि त्यास संलग्न असलेली यंत्रणा पोलिसानी ताब्यात घेतली असून त्याची तपासणी चालू आहे, अशी पोलिसानी माहिती दिली.
व्हिडिओमुळे मिळाली घटनेची थोडी माहिती
ज्या इमारतीच्याखाली खून झाला त्या इमारतीच्या समोर असलेल्या दुसऱया एका इमारतीत राहणाऱया एका शेजाऱयाने या दुकानाबाहेर घडलेल्या घटनेचे व्हिडिओ चित्रिकरण केले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर झळकत आहे. या व्हिडिओतील चित्रफितीनुसार ‘कृष्णी ज्ल्वेलर्स’चे मालक दुकानाच्या बाहेर आलेले आहेत ते कोणाला तरी अडवत आहेत आणि दोन ते तीन हल्लेखोर घटनास्थळाहून पळून जात असल्याचे दिसत आहे.
सपना प्लाझा इमारतीकडून पळाले हल्लेखोर
यावेळी आजुबाजुला लोक आहेत आणि ते धावणाऱयांनाही पाहत आहेत. मात्र काय झालेले आहे याची कल्पना न आल्यामुळे पळून जात असलेल्या या हल्लेखोरांना कोणीही अडवत नाहीत. ‘सपना प्लाझा’ इमारतीजवळून जात असलेल्या रस्त्यावरुन हे हल्लेखोर धावत जात असल्याचे चित्रफित दिसत आहे. हल्लेखोरांनी किती रकमेचे दागिने लंपास केले किंवा सोन्याच्या अलंकारांची चोरी केली की नाही हे कळू शकलेले नाही.
स्वप्नील भाजपच्या कृष्णी वाळकेंचे पुत्र
मयत स्वप्नील वाळके हे भारतीय जनता पक्षाच्या मडगावातील क्रियाशील कार्यकर्त्या कृष्णी वाळके यांचे ते पुत्र होत. गेल्या वर्षी कृष्णी वाळके यांच्या जावयाचे निधन झाले होते. बुधवारी झालेल्या मुलाच्या खुनामुळे त्यांच्यावर हा आणखी एक आघात झाला आहे.
आज होणार शवचिकित्सा
आज गुरुवारी होणाऱया शवचिकित्सेत मयत स्वप्नील वाळके यांच्यावर गोळी झाडली होती का? हे स्पष्ट होणार आहे. मृतदेह मडगावच्या मोती डोंगरावरील इस्पितळातील शवागृहात ठेवण्यात आला आहे.
मडगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केलेला आहे.
‘त्या’ खुनाचा अजून तपास नाही
सुमारे 5-6 वर्षापूर्वी म्हापसा येथे भरबाजारात रत्ना रायकर या ज्वेलरी दुकानाच्या मालकाचा गोळय़ा झाडून खून करण्यात आला होता. मात्र अनेक वर्षे झाली तरी या प्रकरणाचा तपास लावण्यात गोवा पोलिसांना अजून यश आलेले नाही आणि ही एक शोकांतिका आहे.
राज्यभरातील सराफी दुकाने आज बंद
गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनने मडगावातील ज्वेलर स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणाचा तीव्र निषेध केला आहे. घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी लवकरात लवकर लुटेऱयांना गजाआड करावे, अशी मागणी केली आहे. खुनाची घटना घडल्यानंतर बुधवारी मडगावातील अनेक सराफांनी आपली दुकाने बंद ठेवून या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना मदत केली. असोसिएशनने राज्यभरातील सर्व ज्वेलरी दुकाने आज गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सदस्य, तसेच सर्व ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी तथा माशेल येथील कालिका ज्वेलर्सचे मालक नीलेश शिरोडकर आणि फोंडा गोल्ड डिलर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कारेकर यांनी ‘तरुण भारत’ला संपर्क साधून दिली.
दुकानात सापडले पिस्तूल, काडतूस, मॅगझीन
पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिसी श्वानाला आणण्यात आले. ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. तळमजल्यावर असलेल्या या दुकानाची पाहणी करण्यात आली तेव्हा दुकानात एक गावठी पिस्तूल सापडले. शिवाय दुकानात एक रिकामी काडतूसही सापडली. तीन गोळय़ा असलेले मॅगझीन सापडले, अशी मडगाव पोलिसांनी माहिती दिली.
पिस्तुलात सापडल्या तीन गोळय़ा
ज्या अर्थी एक रिकामी काडतूस सापडली त्या अर्थी हल्लेखोरांनी दुकानदार स्वप्नील वाळके यांच्यावर एक गोळी झाडलेली असावी. उर्वरित तीन गोळय़ा पिस्तूलात होत्या. शिवाय तेथे सुऱयाचे एक कव्हरही पोलिसांना सापडले आहे.