मालगुंड बाजारपेठेतील अपघात
वार्ताहर/ गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेतील हॉटेल स्वादच्यासमोर बुधवारी दुपारच्या सुमारास भरधाव ओमनी कारने एका वृध्देला चिरडल्याची घटना घडली. सरस्वती गणपत वाळवे (85, रा. मालगुंड-शिवगणवाडी) असे या वृध्देचे नाव आहे. यातील गंभीर जखमी वाळवे यांना अधिक उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी ओमनी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.
या अपघाताबाबत जयगड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिह्यातील कुपवाड येथील तुषार मनोहर मुळ्ये (20, ओमनी चालक), समीर दलगीर मकानदार (29) असे दोघे तरुण मारुती ओमनी (एमएच 10 एम 0218) गाडीने गणपतीपुळे येथे आले होते. दुपारी मालगुंड येथे फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यानंतर गणपतीपुळेच्या दिशेने जात असताना याच रस्त्यावरून पायी चालत घराकडे जाणाऱया सरस्वती वाळवे यांना मागून धडक दिली. यानंतर येथील ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र वाळवे यांची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यास सांगितले.
या घटनेची खबर मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा करत ओमनी चालक तुषार मुळय़े याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. बी. भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील करत आहेत.