मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : शुल्क कमी करण्याचा विचार
प्रतिनिधी/ बेंगळूर
युक्रेनमधून परत आलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिल याकडे लक्ष देत आहे. अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधी युक्रेनमधून परतावे लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी उपाययोजना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शुल्क कमी करण्याचा विचार करीत आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे हा यामागचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले.
नवीनच्या अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी चळ्ळगेरे येथे जाण्याआधी दावणगेरे येथे पत्रकारांशी ते बोलत होते. युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम भिन्न स्वरुपाचा आहे. तेथे अर्धवट शिक्षण सोडून मायदेशात परतलेले विद्यार्थी विविध राज्यांमधील आहेत. त्यामुळे केंद्र सरकार याविषयी गंभीरपणे विचार करीत आहे, असे ते म्हणाले.
राज्यात सरकारी कोटय़ातील वैद्यकीय जागांचे शुल्क कमी आहे. तरी देखील खासगी कोटय़ासाठी भरमसाठ शुल्क आकारले जाते. 90 ते 95 टक्के गुण मिळालेले अनेक विद्यार्थी नीट परीक्षेत उत्तीर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यांना खासगी महाविद्यालयांच्या कोटय़ातून आणि एन. आर. आय. जागा मिळविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात शुल्क भरावे लागते. त्यामुळे हे विद्यार्थी पर्यायी मार्गाचा शोध घेतात. आपल्या राज्यातील वैद्यकीय शुल्क कमी करण्यासाठी अ, ब, क अशी वर्गवारी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. खासगी महाविद्यालयांमधील शुल्क कमी करण्यासंदर्भात अधिकाऱयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
नवीनचे पार्थिव अंतिम विधीनंतर मेडिकल कॉलेजला दान
युक्रेनमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 21 दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या नवीन ग्यानगौडर याचे पार्थिव सोमवारी सकाळी हावेरी जिल्हय़ाच्या चळ्ळगेरे (ता. राणेबेन्नूर) येथे आणण्यात आले. अंतिम विधीनंतर नवीनचे पार्थिव त्याच्या कुटुंबीयांनी दावणगेरे येथील मेडिकल कॉलेजला हस्तांतर केले.
युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या नवीन शेखरप्पा ग्यानगौडर यांचा 1 मार्च रोजी खारकिव्ह या शहरात मृत्यू झाला होता. 21 दिवसांनंतर त्याचे पार्थिव त्याच्या गावी चळ्ळगेरे येथे सकाळी 9 वाजता आणण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. नवीनचे पार्थिव दुपारी 3 पर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, खासदार शिवकुमार उदासी, जी. एम. सिद्धेश्वर, आमदार अरुणकुमार, तरळबाळू मठाचे शिवमूर्ती शिवाचार्य स्वामीजी, वचनानंद स्वामीजी यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. नवीनसमवेत युक्रेनमध्ये शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांनीही अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर लिंगायत पद्धतीनुसार विधी करण्यात आला. नंतर गावातून अंत्ययात्रा काढून तो दावणगेरे येथील मेडिकल कॉलेजला दान करण्यात आला. या कॉलेजच्या शरीररचना शास्त्र विभागाकडे मृतदेह हस्तांतरीत करण्यात आला.
समन्वयाच्या आधारे पार्थिव आणण्यात यश
तत्पुर्वी नवीनचे पार्थिव बेंगळूर विमानतळावर आणण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले, युक्रेनमधून नवीनचे पार्थिव आणण्याचे अशक्य काम पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. युक्रेनसह आजुबाजूच्या देशांशी संपर्क साधून राजतांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. त्या देशांमधील विमानतळांवर विशेष विमानाला परवानगी मिळवून पार्थिव भारतात आणण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रिया समन्वयाच्या आधारे झाली आहे. युद्धभूमीतून अनेक विद्यार्थी सुरक्षितपणे परतले आहेत. दुदैवाने नवीनचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी नवीनच्या कुटुंबीयांशी फोनवरून संपर्क साधून सांत्वन केले होते. युद्ध सुरू असलेल्या भागातूनच नवीनचे पार्थिव ताब्यात घेण्यात आले होते. तेथून वार्सोवा येथे आणून पुन्हा झिंक कोटींग करून दुबईला आणण्यात आले. तेथून बेंगळूरला आणण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच नवीनचे पार्थिव भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद मोदी यांना फोन करून धन्यवाद दिले.