प्रतिनिधी/ फोंडा
तामसुली, खांडोळा-माशेल येथे रहिवासी वसाहतीमधील बंगला भर दिवसा फोडून चोरटय़ांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून अंदाजे रु. 13 लाखांचा ऐवज लंपास केला. काल मंगळवारी दुपारी 12 वा. सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. बंगल्याचे मालक विनायक दत्ता नाईक यांनी या प्रकरणी फोंडा पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरटय़ांनी किचनकडील खिडकीचे लोखंडी गज कापून आंतमध्ये प्रवेश केला व बंगल्याच्या तळ व पहिल्या मजल्यावरील एकूण चार कपाटे फोडून ही चोरी केली. तक्रारदार विनायक हे निवृत्त सरकारी अधिकारी असून घरात त्यांची पत्नी, मुलगा, सून व नातू असे पाच कुटुंबसदस्य राहतात. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी, मुलगा व सून कामावर तर नातू शाळेत गेल्यानंतर विनायक हे साधारण 9 वा. सुमारास घर बंद करुन बाजारात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. दुपारी 12 वा. सुमारात ते जेव्हा घरी परतले तेव्हा तळमजल्यावरील त्यांच्या बॅडरुमचा दरवाजा खुला होता. कपाटेही उघडी होती व आंतमधील सर्व सामान अस्थाव्यस्त टाकून देण्यात आले होते. तोच प्रकार मुलगा व सून राहत असलेल्या पहिल्या मजल्यावर आढळून आला. किचनमधील खिडकी उघडी होती. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रथम माशेल पोलीस चौकीत व नंतर फोंडा पोलीस स्थानकात संपर्क साधला.
घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर विनायक नाईक व त्यांची पत्नी राहत असलेल्या पहिल्या मजल्यावरील कपाटातून 2 बांगडय़ा, 2 अंगठय़ा, 4 कर्णालंकार व काही चांदीची भांडी तसेच रु. 60 हजार रोख पळविल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा मुलगा वैभव राहत असलेल्या पहिल्या मजल्यावरील दोन कपाटामधून साधारण रु. 10 लाखांचे दागिने व रु. 1 लाखाची रोख रक्कम मिळून साधारण रु. 11 लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्याचे त्यांनी आपल्या जबानीत सांगितले आहे. जवळच्या नातेवाईकाचे लग्न असल्याने काही दिवसांपूर्वीच बँकेच्या लॉकरमधून हे दागिने घरी आणले होते. प्राथमिक तपासामध्ये या चोरीमध्ये तिघाजणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते. चोरटय़ांनी अत्यंत शिताफिने ही चोरी केली असून घरात प्रवेश करताच आधी घरातील सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी निकामी केले. भरदिवसा रहिवासी कॉलनीमध्ये कुणालाच कुठलाही सुगावा लागू न देता ही चोरी केल्याने चोरटे अत्यंत सराईत असल्याचे स्पष्ट होत आहेत. घटनास्थळी तपासकार्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञाची मदत घेण्यात आली. मात्र ठोस असे काही हाती लागू शकलेले नाही. निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर व आदित्य वेळीप हे याप्रकरणी तपास करीत आहेत.
आठवडय़ाभरापूर्वी बाणस्तारीत चोरी
दरम्यान आठ दिवसांपूर्वी बाणस्तारी बाजारातील मोबाईल विक्री व दुरुस्तीचे एक दुकान फोडून साधारण दीड लाख रुपांचा ऐवज पळविला होता. गेल्या 20 जानेवारी रोजी हा चोरीचा प्रकार घडला होता. खांडोळा व बाणस्तारी हे अंतर साधारण चार किलो मिटर आहे. लागोपाठ झालेल्या या चोरीच्या घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.