क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
भवानीनगर स्पोर्ट्स क्लब आयोजित भवानीनगर प्रिमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचमुखी स्पोर्ट्स संघाने आरूष स्पोर्ट्स संघाचा 8 गडय़ानी पराभव करून चषक पटकाविला. मोहसीनला मालिकावीर तर प्रकाश ओरेवालेला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. भवानीनगर येथे आयोजित प्रिमियर लीग स्पर्धेत एकूण 8 संघानी भाग घेतला होता. त्यांच्यात साखळी व बाद पद्धतीचे सामने खेळविण्यात आले. अंतिम सामन्यात आरूष स्पोर्ट्स संघाने 5 षटकात 4 बाद 30 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंचमुखी स्पोर्ट्स संघाने 5 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून सामना 8 गडय़ानी जिंकला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे वरदराज स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष राजेश जाधव, बबलू गवळी, विजय नायडू, भाऊ आगलावे, सारंग राघोचे, प्रसाद गावडे, सचिन दिवटे, प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पंचमुखी स्पोर्ट्स संघाला तर उपविजेत्या आरूष स्पोर्ट्स संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर प्रकाश ओरेवाले, उत्कृष्ट फलंदाज संदीप गावडे, उत्कृष्ट गोलंदाज गणेश कुडे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुनील कित्तूर, उत्कृष्ट यष्टीरक्षक दिनेश, मालिकावीर मोहसीन यांना चषक व रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भवानी नगर स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सभासदानी विशेष परिश्रम घेतले.