दिल्लीः जीसीएचे सचिव विपुल फडके यांना क्रिकेट कॅप देताना दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली. बाजूला खजिनदार शशी खन्ना आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष डॉ. सी. के. खन्ना.
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
भविष्यात दिल्लीत गोव्याच्या सीनियर क्रिकेट खेळाडूंना रणजी स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळण्यास मिळावे तसेच सरावासाठी मैदाने उपलब्ध व्हावी यासाठी गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विपुल फडके यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेशी काल सविस्तर चर्चा केली.
सध्या जीसीएचा सीनियर क्रिकेट संघ दिल्लीत सराव सामने आणि सराव करण्यासाठी गेला आहे. पुडिचेरीत गोव्याच्या संघाला मातब्बर संघांविरूद्ध सामने खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही आणि यामुळे संघ दिल्लीला गेला. काल जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली आणि खजिनदार शशी खन्ना यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष डॉ. सी. के. खन्ना हे उपस्थित होते.
दिल्ली क्रिकेट संघटनेच्या आगामी निवडणुकीसाठी फडके यांनी जेटली आणि खन्ना यांना सुयश चिंतिले. रोहन जेटली यांच्यासमवेत विपुल फडके यांची सविस्तर चर्चा झाली. गोव्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर असल्याने गोव्याच्या सीनियर क्रिकेटपटूंना सराव करायला मिळत नाही. आणि प्रामुख्याने सराव सामनही खेळायला मिळत नाही. यासाठी गोव्याचा संघ पुडिचेरी, मध्यप्रदेश आणि दिल्लीत या राज्यात सरावसाठी जात असल्याचे फडके यांनी रोहन जेटलींना सांगितले.
दिल्ली क्रिकेट संघटनेने गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाला सध्या दिल्लीच्या दौऱयात दिलेल्या सहकार्याबद्दल जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी आभार मानले. रणजी स्पर्धेपूर्वी सराव सामने आयोजित करण्यासाठी आणि सराव करण्यासाठी गोव्याच्या सीनियर क्रिकेट क्रिकेटपटूंना तसेच गोवा क्रिकेट संघटनेला दिल्ली क्रिकेट संघटना नेहमीच सहकार्य करणार असल्याचे आश्वासन अध्यक्ष रोहन जेटली यांनी यावेळी सचिव विपुल फडके यांना दिले आहे.