आशिया पंच विक्रम भांगले यांचे प्रतिपादन : वेंगुर्ल्यात एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
नेमबाजी हा भारतातील सर्वात जास्त प्राधान्य असलेला खेळ आहे. शासनानेही क्रिकेटपेक्षा या खेळाला जास्त प्राधान्य दिले आहे. ‘क’ वर्ग न. प. मध्ये सर्वात मोठी शूटिंग रेंज उपलब्ध करुन देणारी वेंगुर्ले न. प. ही पहिली न. प. आहे. या एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्रामुळे भविष्यात येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील, असा विश्वास आशिया पंच व गोवा शूटिंग क्लब चे सेक्रेटरी ऍड. विक्रम भांगले यांनी केले.
वेंगुर्ले नगर परिषदेने कॅम्प येथील व्यायामशाळेच्या वरच्याभागात एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्र सुरु केले असून या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन भांगले यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेविका साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, कृपा गिरप, नगरसेवक विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, न. प. अधीक्षक संगीता कुबल, न. प. कर्मचारी सागर चौधरी, पंकज केळुसकर आदी उपस्थित होते.
भांगले म्हणाले, ऑलिंपिक स्पर्धामध्ये जेवढी रेंज असते, तेवढी रेंज वेंगुर्ले न. प. ने येथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल न. प. चे कौतुक केले. तसेच या शूटिंग रेंज प्रशिक्षण केंद्रासाठी अनेक पुरस्कार लाभलेले कांचन उपरकरसारखे प्रशिक्षक लाभले याबद्दलही समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना नेमबाजी प्रशिक्षणासाठी सावंतवाडी येथे जावे लागत असे. त्यात वेळ व पैसा वाया जात असल्याने येथे हे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ खेळाडूंनी लाभ घ्यावा व वेंगुर्ल्याचे तसेच जिल्हय़ाचे नाव रोशन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले. स्वागत नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रास्ताविक कांचन उपरकर, सूत्रसंचलन प्रशांत आपटे यांनी केले, तर आभार शीतल आंगचेकर यांनी मानले.