प्रतिनिधी/ बेळगाव
महाद्वार रोड सांस्कृतिक कमिटी संजय कडोलकर खुल्या भव्य नृत्य स्पर्धांना शनिवारपासून मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला आहे. सोमवारी तिसऱया दिवशी देखील नृत्य स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 32 हून अधिक स्पर्धकांनी एकापेक्षा एक सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
प्रारंभी ऐश्वर्या ए. एस., वैष्णवी भातकांडे, संस्कृती हुलामनी यांनी भरतनाटय़म् सादर करून मंत्रमुग्ध केले. डय़ुएट गटात अक्षता कदम, रितिका भूमी, मयुरी धामणेकर, समर्थ पृथ्वीराज यांनी नृत्य सादर केले.
सोलो डान्स लहान गटात शशिकांत जकाती, संजना पाटील, खुशी धुत, राधिका भातकांडे यांनी सादरीकरण केले. ग्रुप डान्समध्ये संजय घोडावत, दुर्गा गर्ल्स, अभिषेक डान्स अकॅडमी, बिट बेकर्स ग्रुप आदी ग्रुपनी उत्तमरित्या नृत्य सादरीकरण करून उपस्थितांकडून टाळय़ांची दाद मिळविली.
या नृत्य स्पर्धेमध्ये जुन्या व नवीन हिंदी, मराठी, कन्नड चित्रपटांच्या गीतांबरोबर भरतनाटय़म्देखील सादर केले. या नृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुंबई येथील नृत्य कलाकार आयुषी अमृते व रोहन सिंग काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती खास आकर्षण ठरत आहे. यावेळी बेळगाव जिल्हय़ासह कोल्हापूर व गोवा येथील स्पर्धक सहभागी झाले होते.