गुरुवारी मध्यरात्री काकती येथे घडली घटना, पोलीस तपास सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
काकती येथील तरुणांच्या दोन गटात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री काकती येथे ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलाउद्दीन नजीरसाब पकाली (वय 32, रा. मुस्लीम गल्ली, काकती) असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री काकती येथील टिसीआय पेट्रोल पंपाजवळ सर्व्हिस रोडवर ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेतील सलाउद्दीनला सिव्हिल हॉस्पिटलला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यासंबंधी अमर शाम मेत्री, अखिल शिवाप्पा मेत्री (दोघेही रा. काकती) यांच्यासह चार ते पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार खून झालेला सलाउद्दीन हा तीन महिन्यांपूर्वी काकती येथे भाडोत्री घर घेवून रहायला गेला होता. तो स्क्रॅपचा व्यवसाय करीत होता. यापूर्वी अमर मेत्री व अखिल मेत्री यांच्या सोबत त्याची भांडणे झाली होती. गुरुवारी रात्री मोहरम कार्यक्रम बघून सलाउद्दीन आपल्या मित्रांसमवेत घरी जात होता. त्यावेळी पेट्रोल पंपाजवळ सर्व्हिस रोडवर दोन गटात भांडण जुंपले होते. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सलाउद्दीनवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. सुरुवातीला त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. तेथून सिव्हिल हॉस्पिटलला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून 12.55 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.