गोव्याच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक भाऊसाहेबांची आज 110 जयंती
महेश गावकर / फोंडा
गोवा मुक्तीनंतर शैक्षणिक क्रांतीचे बीज रोवणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुरू केलेल्या सरकारी प्राथमिक शाळा आजच्या घडीला ओस पडू लागल्या आहेत. भाऊसाहेबांची 110 वी जयंती साजरी करताना मडकई मतदार संघात दृष्टीक्षेप टाकल्यास सुमारे 14 सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याचे विदारक चित्र दिसते. फोंडा तालुक्याही 153 प्राथमिक शाळापैकी तब्बल 47 शाळा बंद पडलेल्या आहेत. येत्या काळात हा आकडा आणखी फुगलेला दिसल्यास नवल वाटू नये ? याला जबाबदार कोण? सरकार की पालक. शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण झपाटयाने होताना फोंडा तालुक्यात भविष्यात सरकारी शाळांची संख्या निम्यावर येण्याची नामुष्की ओढवण्याची चिन्हे आहेत.
80 च्या दशकात शिक्षण घेण्यासाठी सरकारी प्राथमिक शाळा गाठण्यासाठी कित्येक किलोमिटर पार करावे लागत असे आज अशी परिस्थिती राहिलेली नसून प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कदंब बसेसची सोय करण्यात आलेली आहे. तरीही सरकारी शाळांची परिस्थिती सुधारत नाही हेच एक कोडे आहे. दरवर्षी हजेरीपटाअभावी बंद पडत असलेल्या शाळामागील लॉजीक कुणालाच कळत नसून ते मॅजिक पुनः प्राप्त करण्यासाठी आधुनिक भाऊसाहेबांची आज नितांत गरज आहे.
फोंडयात एकूण 107 शाळात 203 शिक्षक
प्राथमिक शाळेचा पाया मजबूत करण्यासाठी सरकारतर्फे कोटय़ावधी रूपये खर्च करण्यात येते. आजही प्राथमिक शाळेत शिक्षीका म्हणून रूजू होण्यासाठी शर्यत पाहायला मिळते. फोंडा शिक्षण खात्याच्या ऐडीईआय माहितीनुसार फोंडय़ात एकूण 107 सरकारी प्राथमिक शाळात सद्यपरिस्थितीत वर्ग चालतात. एकूण 203 शिक्षक कार्यरत असून त्यापैकी मागील तीन चार वर्षाच्या कार्यकाळात सुमारे 18 नवीन शिक्षकांची भर्ती करण्यात आलेली आहे. आज सरकारी प्राथमिक शाळेत मक्तेदारी महिला शिक्षकांची आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतके गुरूजी उपलब्ध असून पुर्वीसारखा गुरूजीचा धाकही आज विद्यार्थ्यांना राहिलेला नाही. आज प्रत्येक पालकांना इंग्रजीचे खुळ लागलेले आहे, पालक हजारों रूपये देणग्या देऊनही खासगी शाळात प्रवेश घेणे पसंत करतात. त्यामुळे सरकारी प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांची गळती सुरू झालेली आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत व भरमसाट फी देऊ न शकणाऱया पालकामुळेच जेमतेम हजेरीपटासह किमान सरकारी शाळा तग धरून आहेत. शैक्षणिक धोरण राबविताना प्रश्न शिक्षण मराठीतून का इंग्रजीतून हा नसला पाहिजे, विद्यार्थी परिक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनला पाहिजे हे असायला हवे. त्यासाठी काहीतरी ‘मॅजिक’ची आज गरज आहे. आज या बहुतेक शाळांचा उपयोग केवळ निवडणूकीच्या काळात मतदारांच्या हातावर शाही लावण्यापुरते शिक्षण घेण्यासाठी राहिलेला दिसून येतो.
मडकई मतदारसंघात निम्याहून अधिक शाळा बंदावस्थेत फोंडा तालुक्यातील मडकई मतदार संघात सर्वाधिक सरकारी प्राथमिक शाळा आहेत. परंतू निम्याहून अधिक शाळा आज बंद पडलेल्या आहेत. एकूण 14 शाळा बंदावस्थेत आहेत. बंद पडलेल्या प्राथमिक शाळामध्ये आडपई, आगापूर-1, उंडीर आगापूर, फर्मागुडी बांदोडा, वाडीवाडा कुंडई, कवळे, दुर्भाट, खारवडे दुर्भाट, तळूले बांदोडा, वाडी तळावली, कासवाडा तळावली, पारंपाई मडकई, दुतळे मडकई, उंडीर आगापूर या प्राथमिक शाळा बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. भाऊसाहेबांनी सुरू केलेली रामनाथी येथील शाळा मागील काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे मात्र त्याच्यात काही अंतरावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी भरघोस देणग्या देऊन पालकांची चुरस पाहायला मिळते. सरकारने भाऊसाहेबांच्या 110 व्या जयंतीदिनी सरकारी प्राथमिक शाळांची तब्येत सुधारण्यासाठी प्रयत्न, ठोस भूमिकेसह येथील सुविधा व शिक्षकांचा विद्यादानाचा दर्जा सुधारण्यासाठी परीश्रम घेणे अत्यवाश्यक बनले आहे.