मगो कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब बांदोडकर यांना वाहिली आदरांजली
वार्ताहर / मडकई
गोमंतकाचे भाग्यविधाते व पहीले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे गोव्यासाठीचे योगदान व दुरदृष्टी पाहुन मतदारांनी विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या कार्याशी तुलना करावी. गोव्याचा विकास न करता फक्त आमदार फोडाफोडीची कारस्थाने केलेली आहेत. कट कारस्थानातच वेळ खर्ची घालणाऱयांना आयुष्य भराची अद्दल घडविण्यासाठी मतदारांनी सद्सद् विवेक बुध्दीला स्मरून मतदान करावे. तरच भाऊसाहेबांना ही खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन मगो ज्येष्ठ नेते मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी फर्मागुडीत स्व. भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त केले.
फर्मागुडी येथे स्व. दयानंद बांदोडकर यांच्या अर्ध्य पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली देताना आमदार सुदिन ढवळीकर बोलत होते. यावेळी मगो पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर, केंद्रिय समीतीचे सचीव प्रताप फडते, खजीनदार अनंत नाईक, सदस्य अनिल नाईक, महेश पणशीकर, बांदोडा सरपंच राजेश नाईक, कवळे पंचायतीचे सरपंच राजेश कवळेकर, मडकई पंचायतीच्या सरपंचा लक्ष्मी वळवईकर, आडपई दुर्भाट पंचायतीच्या सरपंच सरोज नाईक, वाडी तळावली पंचायतीचे सरपंच दिलेश गावंकर, धारबांदोडा पंचायतीचे माजी सरपंच बालीजी उर्फ विनायक गावंस, बांदोडा जिल्हा सदस्य गणपत नाईक, वेलींगचे दामोदर नाईक, माजी जिल्हा उपाध्यक्ष चित्रा प्रताप फडते, शिवदास गावडे, पंचसदस्य भजनी कलाकार विशांत नाईक, तसेच मडकई मतदार संघातील आजी माजी सरपंच, पंचसदस्य व फोंडा तालुक्यातील मगो कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थीत होते.
1963 ते 1980 पर्यंत माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब व माजी मुख्यमंत्री शशिकला ताईं या दोघांचे कार्य संस्मरणीय आहे. सत्याची कास धरून त्यांनी राजकारण व समाजकारण केले. असत्याचा मार्ग कधीच धरला नाही. म्हणून काळापरत्वे त्यांच्या कार्यरूपाने हे दोन्ही दिग्गज नेते चिरंजीवी आहेत. 1965 साली भाऊंनी धारबांदोडा येथील नदी काठी वसलेल्या गावांचे स्थलांतर केले होते. त्यातील काही घरे राहून गेली होती. परमेश्वराच्या कृपेने त्यांना वेळ मिळाला असता तर या घरांचे सुध्दा त्यांनी स्थलांतर केले असते. आणि या पुरग्रस्त वादळा पासून त्यांचे रक्षण झाले असते. असे पूढे बोलताना मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले, गोवा मुक्ती नतंरच्या काळात सत्तेवर आलेल्या मगो पक्षाच्या सरकारने भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आव्हाने पेलली. त्यांचे अव्दितीय कार्य चित्रीत करणारे व त्यांची जीवनशैली अधोरेखीत करणारे गंगाराम म्हांबरे यांचे ‘उत्तंग’ पुस्तक मगो पक्ष प्रकाशीत करीत आहेत. फोडा फोडीचे राजकारण करणाऱया भाजपा नेत्यांनी हे पुस्तक वाचावे. व त्यातून राजकारण व समाजकारणाचा धडा घ्यावा.