प्रतिनिधी/ बेळगाव
साप म्हटले की सर्वांना भीती वाटतेच. वृद्धांना तर लवकर पळता येत नाही, त्यामुळे साप आला की त्यांची पाचावर धारण बसते. घरकुल या बेन्नाळी येथील वृद्धाश्रमात असणाऱया वृद्धांचीसुद्धा नेमकी हीच अवस्था झाली, जेव्हा आश्रमात एक नाग फणा काढून त्यांच्या समोर उभा ठाकला.
पाडव्यादिवशी सणाच्या आनंदात असताना साप पाहिल्याने सर्व वृद्ध घाबरून गेले. आश्रमाचे व्यवस्थापक रामनाथ नाईक यांनी त्वरित सर्पमित्र गणेश दड्डीकर यांच्याशी संपर्क साधला. दड्डीकर यांनी ताबडतोब आश्रमात जाऊन सापाला पकडले व जंगलामध्ये सोडून दिले. तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
आपल्या हाकेला धावून येऊन भाऊबीजेदिवशी भावाने आपले रक्षणच केले, अशी भावना आश्रमातील महिलांनी व्यक्त केली आणि गणेश दड्डीकर यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. आजवरच्या दिवाळीमधील ही भाऊबीज अनोखी आणि संस्मरणीय असल्याचे दड्डीकर यांनी सांगितले.