आमदार ग्लेन तिकलो यांचे प्रतिपादन हळदोणा अर्बन सोसायटी शाखेचा नवीन जागेत स्थलांतर सोहळा
प्रतिनिधी / पर्वरी
सहकार क्षेत्रातील पतसंस्थेचे भागिदार व ठेवीदार यांचा संपादन केलेला विश्वास कायम ठेवून व्यवहार केल्यास पतसंस्थेची उन्नती आणि उद्धार वाढत जाते. पतसंस्था नावरुपास येते. पतसंस्थेच्या शाखा वाढत जातात. पतसंस्थेच्या संचालकाच्या जागृतेमुळे वार्षिक उलाढाल वाढून संस्थेला नफा होतो, असे प्रतिपादन आमदार ग्लेन सौझा तिकलो यांनी हळदोणा अर्बन को. ऑप. पेडीट सोसायटीच्या 27 व्या वर्धापनदिनी केले.
संस्थेच्या 27 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हळदोणा अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या शाखेचे स्थलांतर नवीन मालकीच्या जागेत करण्यात आले. या शाखेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार ग्लेन तिकलो यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी सरपंच सुभाष राऊत, पंचसदस्य प्रणेश नाईक, माजी चेअरमन गुरुदास मळीक, उद्योजक शिवशंकर मयेकर तसेच संस्थेचे विद्यमान चेअरमन प्रेमानंद प्रभू व सचिव दिलीप हळदणकर उपस्थित होते.
गावातील समविचारी तरुण मंडळी संघटीत होऊन सर्वांच्या विकासासाठी सुरु केलेल्या संस्थेमागे तळमळीने कार्य करतात. या पतसंस्थेमुळे या गावातील व भागातील तरुणांना, होतकरु लोकांना स्वतःचा व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळते. आर्थिक मदत प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या जीवनात समाधान मिळते, असे आमदार तिकलो म्हणाले. मागील 20 वर्षे संस्थेच्या संचालक मंडळाने लोकांचा विश्वास संपादन केला. भागिदार व ठेवीदार यांना गरजेनुसार अर्थसाहाय्य केले. त्यामुळेच या संस्थेचे संचालक, कर्मचारी व भागिदार प्रशंसेस पात्र ठरतात. या संस्थेचा उद्धार व्हावा तसेच हळदोणावासियांना अभिमान वाटावा असे भरीव कार्य भविष्यात घडत राहो, अशा शुभेच्छा आमदार ग्लेन तिकलो यांनी व्यक्त केल्या. यावेळी संस्थेचे सचिव दिलीप हळदणकर, उद्योजक शिवशंकर मयेकर, संस्थेचे माजी चेअरमन गुरुदास मळीक यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. प्रारंभी चेअरमन प्रेमानंद प्रभू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव दिलीप हळदणकर यांनी सोसायटीची माहिती देताना टाळेबंद सादर केला. संचालक स्वप्नील चोडणकर यांनी आभार मानले.