प्रतिनिधी / सांगली
भाच्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृन खून केल्याप्रकरणी मामास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी सुनावली. गणपत गजानन गुजले (वय 43 रा. आळसंद, ता. खानापूर) असे शिक्षा झालेल्या मामाचे नाव आहे. दीपक प्रकाश शिरतोडे असे खून झालेल्या भाच्याचे नाव आहे. जुलै 2017 मध्ये ही घटना घडली होती. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी काम पाहीले.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी गणपत मृत दीपकच्या घराशेजारीच कुटुंबासह राहत होता. त्याला दारुचे व्यसन होते. तो दररोज रात्री मद्यपान करुन पत्नी व मुलांना मारहाण करत होता. दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपी गणपत दारुच्या नशेत पत्नी व मुलांना मारहाण करत होता. स्वतःला वाचविण्यासाठी ती पळत दिपकच्या घरी आली. तिच्या पाठोपाठ आरोपी गजाननही तिथे आला. त्यावेळी दिपकने ‘मामा दारु पिऊन घरच्यांना कशाला मारतोस, गावात, पै-पाहुण्यात आमची अब्रू चालली आहे’’ असे सुनावले. त्यानंतर त्याने दीपकला शिवगीळ केली.
दरम्यान, वाद वाढल्याने दोघांच्यामध्ये बाचाबाची झाली. शेजारील नागरिकांनी भांडणे सोडविल्यानंतर गजानन त्याच्या घरी गेला. त्यानंतर पुन्हा काही काळानंतर गणपत दीपकच्या घरी गेला. घरासमोरचा मोठा दगड त्याने दीपकच्या डोक्यात घातला. त्याच दरम्यान दीपकचा भाऊ दुचाकीची चावी आणण्यासाठी घरी आला असता, त्याला दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिसले. त्याने तत्काळ वडिलांना बोलावून घेतले. जखमी दिपकला पहिल्यांदा कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिथे डॉक्टर नसल्याने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना दीपकचा मृत्यू झाला. याबाबत गणपतच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजवली मिरजे यांनी या गुह्याचा सखोल तपास केला. आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधिश विजय पाटील यांच्यासमोर सुरु होती.
दीड महिन्यात खटला निकाली
दीड महिन्यापूर्वी या खटल्याच्या सुनावणीस सुरवात झाली होती. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. त्यांच्या साक्षी, पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी गणपत गुजले याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी सरकारपक्षाची बाजू मांडली. अत्यंत कमी कालावधीत निकाली होणारा हा पहिलाच खटला ठरला आहे.