3 मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा
भाजपने उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 11 वी यादी जारी करत तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजप महासचिव अरुण सिंह यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने या नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती पत्रकाद्वारे बुधवारी दिली आहे.
भाजपने सेवापुरी मतदारसंघात नीलरतन सिंह पटेल यांना उमेदवारी दिली आहे. रॉबर्ट्सगंजमध्ये भूपेश चौबे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखविला आहे. तर दुदधी मतदारसंघात रामदुला गौड यांना निवडणुकीत मैदानात उतरविण्यात आले आहे. भाजपने 403 सदस्यीय उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 367 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशात भाजपकडून अपना दल आणि निषाद पक्षासोबत आघाडी करण्यात आली आहे.
वाराणसीच्या सेवापुरीमध्ये भाजपची उमेदवारी मिळालेले नीलतरन पटेल हे सध्या अपना दलाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ मागील निवडणुकीत अपना दलाला देण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी सेवापुरीसह रोहनिया मतदारसंघ अपना दलासाठी सोडण्याची मागणी केली होती. रोहनिया मतदारसंघातील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. यामुळे रोहनिया हा मतदारसंघ अपना दलाला देण्यात आल्याचे मानले जात आहे. तर सेवापुरीमध्ये अपना दलाचे आमदार नीलतरन पटेल यांना भाजपने स्वतःचे निवडणूक चिन्ह दिले आहे.